मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले. राष्ट्रवादीच्या इतर सर्व मंत्र्यांनाही वजनदार खाती मिळाली आणि त्यानंतर दुपारी बातमी धडकली, ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावरील शस्त्रक्रियेची!
त्यांची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समजताच अजित पवार यांनी संध्याकाळी कोणताही लवाजमा न वापरता सुनेत्रा वहिनींसह थेट सिल्व्हर ओक बंगला गाठला. सुमारे अर्धा तास या ठिकाणी दिलेल्या भेटीनंतर अजित पवार पुन्हा देवगिरी या शासकीय निवासस्थानी पोहोचले.
प्रतिभाताई पवार यांच्यावर हातावर काल ब्रिच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. यानंतर संध्याकाळी अजितदादा सिल्व्हर ओक बंगल्यावर पोचले. त्यांच्यासमवेत पार्थ पवारही उपस्थित होते. सुमारे अर्धा तास अजित पवार या बंगल्यात होते. अजित पवार आणि प्रतिभा पवार यांचे नातेसंबंध अधिक दृढ आहेत हे सर्वांनाच माहिती आहे.
विशेष म्हणजे अजित पवार माघारी परतेपर्यंत मुंबईतील कोणत्याही पत्रकारांना याची थेट माहिती अजिबात नव्हती. त्यामुळेच अजित पवार माघारी परतल्यानंतरच पत्रकारांना ही माहिती झाली. अलीकडे पत्रकारिता एवढी रसातळाला पोहोचली आहे की, नातेसंबंधही असतात. यावरती कदाचित पत्रकारितेचाच विश्वास नसावा, म्हणूनही बहुदा अलीकडच्या काळात बहुतांश नेते मंडळी पत्रकारांपासून दूर राहू लागले आहेत. त्यामुळे विश्वासू सूत्र उरलेली नाहीत.
बहुधा त्यामुळेच अजित पवार हे राजभवनात पोहोचले होते, तेव्हा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्यासाठी निघालेले आहेत अशी माहिती पत्रकार देत होते, तीन दिवसापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिलेला पत्रकारांच्या गावीही नव्हता.