मुंबई : महान्यूज लाईव्ह
अजितदादांना व एकूणच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती मिळणार? याची उत्सुकता राज्यभरात सगळीकडे असतानाच राज्य सरकारमध्ये खातेवाटप झाले. नवीन फेरबदलासह खातेवाटप होत असतानाच अजित पवारांकडे अर्थ हे महत्त्वाचे खाते, तर दिलीप वळसे पाटलांकडे सहकार हे दुसरे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला आले.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने अजित दादांकडे अर्थ खाते नको असा कितीही कल्ला केला तरी अर्थखात्यावर दबदबा मात्र अजितदादांचाच राहिला. राज्यपाल रमेश बैस यांनी या नव्या फेरबदलावर मंजुरी दिली.
नव्या फेरबदलामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली सगळी खाती त्यांच्याकडे राहिली असून सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म ही खाती शिंदे यांच्याकडे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थखाते हे अजित पवारांकडे देण्यात आले, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते देण्यात आल्या असून छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार हे खाते देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तर धनंजय मुंडे आता राज्याचे कृषिमंत्री असतील.
आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास, अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन तर संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा व युवा कल्याण ही खाती देण्यात आली आहेत.