बारामती : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची एक क्लिप ऐकवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असल्याची टीका त्यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले. आज बारामती देखील भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला
दोन दिवसांपूर्वी नागपूर मध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असल्याची टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. आज बारामतीत भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
बारामती तालुका भाजप कार्यकर्त्यांकडून बारामतीच्या भिगवण चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ठाकरे यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. भाजप कार्यकर्ते त्यांना राज्यात फिरू देणार नाहीत असा इशारा भाजपाचे अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी दिला.