दौंड : महान्यूज लाईव्ह
महामार्ग आणि राज्य महामार्गावरून चोरट्या पद्धतीने अमली पदार्थांची वाहतूक करणारी वाहने व अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना पकडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत, मात्र दौंड लोहमार्ग पोलिसांच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सलग दोन दिवसात भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस मधून तब्बल ५७ किलो गांजा जप्त केला आहे.
ही माहिती दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सोलंकी यांनी दिली. भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस मधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर १० जुलै रोजी रात्री दौंड रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली.
एस – ५ या कोच मध्ये दोन बेवारस ट्रॅाली बॅग मध्ये एकूण ३३ किलो ८०० ग्राम गांजा आढळला. तर ११ जुलै रोजी रात्री कोणार्क एक्सप्रेसच्या बी – १ या कोच मधील स्वच्छतागृहाजवळ तीन सॅक आढळून आल्या. त्यामध्ये एकूण २३ किलो ४०० ग्राम गांजा आढळून आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय कुमार सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक फेमिदा खान, दिलीप बारवे, प्रदीप गोयकर, नूर शेख, काशिनाथ फुलारी, श्री. केंगले यांनी केली. सदर गांजा कोणार्क एक्सप्रेस मध्ये कोणी ठेवले व ते कोठे उतरविले जाणार होते याविषयी पोलिस प्रशासन अनभिज्ञ आहे. सर्व शक्यतांचा विचार करून तपास केला जात असून हा गुन्हा दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तपासाकरिता वर्ग करण्यात आला आहे. जप्त केलेला गांजा दौंड लोहमार्ग पोलिसांकडे पुढील तपासाकरिता सुपूर्द करण्यात आला आहे.