सचिन पवार – महान्यूज लाईव्ह
वार : मंगळवार.. वेळ दुपारची.. सुप्याच्या पोलिस चौकीसमोर एक सायकल अचानक दुकानदाराने आणून ठेवली.. तब्बल सहा हजारांच्या या सायकलचे गौडबंगाल काय असा प्रश्न प्रत्येकाला पडला.. पण थोड्याच वेळात फौजदार सलीम शेख यांनी आतेश विरेश भोसले या पोरग्याला बोलवले.. आणि सायकलकडे बोट दाखवले.. त्या पोराच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो ऑडी गाडी खरेदी करणाऱ्याच्याही झाला नसेल..!
पानसरेवाडीतील फासेपारधी समाजातील आतेश विरेश भोसले हा सुप्यातील शहाजी हायस्कूलमध्ये शिकतो. त्याची शिक्षणाची जिद्द कायम आहे. म्हणूनच येणाऱ्या अडचणींना न कुढता तो पायी चालत सहा किलोमीटर अंतरावरील सुपे येथील शहाजी हायस्कूलमध्ये जातो. दररोज त्याची सहा किलोमीटरची पायपीट नित्याची बनली आहे.
चार दिवसांपूर्वी गस्तीच्या निमित्ताने व कामाच्या निमित्ताने फिरत असलेल्या सुप्याचे फौजदार सलीम शेख व त्यांच्या पोलिस पथकाला हा पोरगा चालत जाताना दिसला. कुतूहल म्हणून त्यांनी जीप थांबवली. त्याला गाडीत घेतले. गाडीत घेतल्यानंतर अगदी सहजच त्याला विचारले आणि त्याने दिलेल्या माहितीने सारेच जण भारावून गेले.
आतेशच्या या जिद्दीचे कौतुक करायचे, तर त्याची गरज भागली पाहिजे हे सलिम शेख यांनी ठरवले. ते कोणाशीच काही बोलले नाहीत. मात्र दुकानात जाऊन अगोदरच त्यांनी दुकानदाराकडून कमी श्रमात जास्तीत जास्त वेगाने सायकल पळेल अशी सायकल देण्याची सूचना केली. तब्बल सहा हजारांची सायकल त्यांना पसंत पडली.
ही सायकल आज पोलिस चौकीसमोर आतेशच्या ताब्यात दिली आणि जेव्हा आतेश च्या घरासमोर ही सायकल पोचली, तेव्हा त्याच्या कुटुंबाचाा आनंद गगनात मावत नव्हता.