दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर पायथ्याशी ८०० लोकसंख्येचे असलेले पिराचीवाडी या गावात मध्यरात्रीच्या दरम्यान बिबट्याने घरामध्ये घुसून शेळी आणि बकऱ्यांचा जीव घेतला.
१० जुलै रोजी पहाटे ३ वाजता घरामध्ये घुसून या बिबट्याने प्राण्यांचा जीव घेतल्याने मोठी दहशत पसरली आहे. गेली महिनाभर बिबट्याचा वावर होता. आत्तापर्यंत दशरथ सर्जेराव कोचळे यांच्या दोन शेळ्या व महादेव नारायण पोळ यांची एक शेळी आणि रात्री वसंत दगडु पोळ यांची मेंढी व मोहन बाबुराव घोरपडे यांची शेळी, परिसरातील सहा कुत्री बिबट्याने भक्ष्य केली आहेत.
त्यामुळे पिराचीवाडीतील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण आहे. उदरनिर्वाहासाठी पाळलेल्या जनावरांनाच बिबट्या भक्ष करत असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचे आणि दहशतीचे वातावरण आहे.
वन विभागाने बिबट्यांच्या हल्यात माणसांचे मुडदे पडण्याआधीच लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिराचीवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. दुसरीकडे बिबट्याने लक्ष केलेल्या जनावरांची नुकसान भरपाई अपेक्षेनुसार मिळण्याची देखील मागणी केली आहे.