तालुक्यातील नेते अजित पवारांकडे गेले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय..!
‘महागुरू’ ला विसरणे कदापि शक्य नाही केली भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला..! राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर इंदापुरात शरद पवारांच्या विचाराच्या गटाची बैठक..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसची उभी फुट पडल्यानंतर राज्यातील कार्यकर्तेही संभ्रमावस्थतेत पडले. इंदापुरातही आमदार दत्तात्रय भरणे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली. इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मात्र आपापल्या भुमिका स्पष्ट केल्या असताना शरद पवारांच्या विचाराच्या गटाने इंदापुरात बैठक घेऊन शरद पवार यांना पाठिंबा व्यक्त केला.
सर्वसामान्य जनता आजही पवार साहेबांच्या पाठीशी आहे, त्यांचा हा शब्द प्रमाण मानत असल्याने आम्ही शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला, असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. इंदापुरात ही बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली.
‘शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशी भावना व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी बोलताना सागर मिसाळ म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार यांचे व्यक्तीमत्व हिमालयाएवढे आहे. ते राजकारणातील महागुरु आहेत. त्यांच्या विचाराने राज्याची आणि देशाची प्रगती झाली आहे.
राजकारणात ५० वर्ष काम करुन सर्वाधिक योगदान देणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार आहेत. आणि आजही देशाचे पंतप्रधान त्यांचे मार्गदर्शन घेऊन कारभार करत असतील तर पक्षातील आमदारांना केवळ स्वार्थासाठी त्यांच्या बरोबर जाण्याची गरज नव्हती अशी परखड भावना मिसाळ यांनी व्यक्त केली. मात्र पक्ष एकत्र आला तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच आहे असेही सागर मिसाळ म्हणाले.
शरद पवार युवकांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तीमत्व असुन आजपर्यंत अनेक लोकांना घडवले आहे. राजकारणात हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेचे प्राचार्य आहेत. त्यांना परिसाची उपमा अतिशय तंतोतंत लागु होत असल्याने राज्यातील राजकारणाची घडी विस्कटत असताना पुन्हा सुसंकृत पिढी निर्माण करण्यासाठी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत असल्याने आम्ही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास उत्सुक असल्याचे जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान कॉंग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष स्वप्नील पवार यांनी देखील शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातुन पायी फेरी काढुन घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक उपाध्यक्ष अक्षय कोकाटे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलाध्यक्षा छाया पडसळकर, पिंपरी खुर्दचे उपसरपंच व सरचिटणीस नानासाहेब भोईटे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष साजन ढावरे, विद्यार्थी प्रसिध्दी प्रमुख अविराज अंबुडकर, अल्पसंख्याक सेलचे समद सय्यद, कार्याध्यक्ष श्रीकांत मखरे, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष रोहन पिसे आदी उपस्थित होते.