शिरूर : महान्यूज लाईव्ह
विद्युत तारेचा शॉक लागून शिरसगाव काटा (ता.शिरूर) येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्वनाथ चौरंग चव्हाण (वय.२८) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ हा शेतीबरोबरच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी सायंकाळी कांद्याची गाडी भरायला जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. पहाटेच्या सुमारास माघारी परत येत असताना निंबाळकरवस्ती जवळ कच्च्या रस्त्यावर अंधारात रस्त्यावर विद्युतप्रवाह सुरू असलेली तार दिसून आली नाही.
ही तार दुचाकीला अडकल्याने दुचाकी खाली पडून विश्वनाथ याला जोरदार विद्युत शॉक बसला. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर विद्युतप्रवाह बंद करून विश्वनाथ यास बाजूला घेण्यात आले. मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान विश्वनाथ हा मनमिळावू स्वभावाचा म्हणून परिसरात परिचित होता. या झालेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून तुटलेल्या विद्युत तारेने जीव घेतला असल्याने शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.