शिरूर : महान्यूज लाईव्ह
राज्यात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन उपमुख्यमंत्री राज्यातील जनता पाहते आहे, उपमुख्यमंत्री हे पद संवैधानिक नाही असे म्हटले जाते, तरीदेखील सत्तेची गणिते जुळवण्यासाठी उपमुख्यमंत्री पद निर्माण केले गेली. तसाच प्रकार ग्रामपंचायतीमध्ये देखील करण्याची मागणी एका ग्रामपंचायतीने करून सगळीकडे खळबळ उडवून दिली आहे.
उपसरपंच हे पद संवैधानिक नसले तरी बऱ्याचशा ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच कारभार पाहतात. आता पुणे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये देखील ट्रिपल इंजिन सरकारला परवानगी द्यावी अशी मागणी एका ग्रामपंचायतीने करून मोठी खळबळ उडून दिली आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीने अशा प्रकारची मागणी करून सगळीकडे एकच चर्चा उडवून दिली आहे.
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच अंकिता भुजबळ आणि उपसरपंच राहुल भुजबळ यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजेच ग्रामपंचायतींमध्ये दोन उपसरपंच असावेत अशी मागणी केली आहे.
आता दोन उपसरपंच निर्माण केले काय आणि तीन उपसरपंच निर्माण केले काय, तसा काहीच फारसा फरक पडत नाही पण जर ग्रामपंचायत मधल्या सगळ्याच सदस्यांनी आम्हाला उपसरपंच व्हायचे असं म्हटलं तर? प्रश्नात दम आहे ना?
बहुतांशी ग्रामपंचायतचे सरपंच पद हे आरक्षित असल्याने काम करण्याची इच्छा असूनही आरक्षित जागेमुळे संधी हुलकावणी देवून जाते. त्याचप्रमाणे वाढती लोकसंख्या ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व तसेच नागरिकांची गैरसोय होऊ यासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहे. त्याच अनुषंंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन उपसरपंच करण्यासाठी परवानगी ची तरतूद करण्यात यावी तसेच आमच्या मागणीचा सकारात्मक अभिप्राय आम्हाला कळवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिलराव भुजबळ म्हणाले की, गावातही अनेक गटतट असतात .त्यापैकी अनेक सदस्य सरपंच पद आपल्याला मिळावे यासाठी इच्छुक असतात .परंतु आरक्षित जागेमुळे ती संधी मिळत नाही.त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याला कारभार चालविण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री लाभले आहे त्याच प्रमाणे गावगाडा चालविण्यासाठी दोन उपसरपंच असावेत अशी तरतूद करण्यात यावी असे ते म्हणाले.