सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून घवघवीत यश संपादन केले आहे, तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात, ज्या खुर्चीवर बसाल, त्या खुर्चीचा वापर गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा, अशी अपेक्षा आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र लोक लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा नुकताच निकाल लागला असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.या विद्यार्थ्यांचा सत्कार भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला.त्यावेळी भरणे बोलत होते.
आमदार भरणे म्हणाले की तुम्ही सर्वजण शेतकरी कुटूंबातील आहात, तुम्ही मेहनतीने व कठोर परिश्रम करुन उत्तुंग यश मिळवल्यामुळे तुमचे करावे तेवढे कौतुक थोडके आहे.यातील अनेकांनी कोणत्याही बाह्य शिकवण्या न लावता घरच्या घरीच अभ्यास करून गुणवत्ता यादीमध्ये नाव झळकवलेले आहे,हे निश्चितपणे कौतुकास पात्र असून आपण सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने आज त्याचा फायदा असंख्य होतकरू विद्यार्थ्यांना होत असल्याने याचे खूप मोठे समाधान वाटत असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.
तसेच तुमच्या या यशामध्ये आई- वडील, शिक्षक, गुरुजनवर्गासह समाज्याचाही मोलाचा वाटा आहे, याची जाणीव सदैव मनामध्ये ठेवून तुम्ही ज्या खुर्चीवर बसणार आहात, त्या खुर्चीचा वापर गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कराल ही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पदी यश संपादन केलेल्या ज्योती शिंदे (काटी),अभिजीत ढेरे (पळसदेव), करिष्मा वणवे (तावशी), अजयसिंह भाळे (खोरोची), अक्षय शिंदे (बोरी) आणि रणधीर रोकडे (निरवांगी) या गुणवंतांना आमदार भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे, ज्येष्ठ नेते प्रताप पाटील, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईक उपस्थित होते.