बारामती : महान्यूज लाईव्ह
आठ ते दहा जणांच्या जमावाने काठ्या आणि दगडाने दोघा जणांना बेदम मारहाण केल्याच्या खटल्यातून एका आरोपीची बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अण्णासाहेब गिऱ्हे यांनी सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. ७ मे २०१९ रोजी बारामती, खंडोबानगर येथे ही घटना घडली होती. या खटल्याचा निकाल नुकताच लागला.
संताजी ऊर्फ संतोष गायकवाड (रा. बारामती), असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ओंकार भरत गायकवाड (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली होती. याबाबतची अधिक माहिती अशी, ७ मे २०१९ रोजी फिर्यादीच्या वडीलांना व चुलत्यांना आरोपी संताजी गायकवाडसह इतर आठ ते दहा लोकांनी मारहाण केली. फिर्यादींनी जखमींची भेट घेऊन त्यांना उपचारासाठी बारामती येथील सरकारी दवाखान्यात पाठवले व मित्रासह मोटारसायकलवरून निघाले होते.
खंडोबानगर इथे दुपारी तीन वाजता आरोपी व इतर अनोळखी आठ ते दहा लोक यांनी त्यांना अडवले. त्यावेळी आरोपी संताजी त्या अनोळखी लोकांना म्हणाला, ‘हाच तो मुलगा, त्याला सोडू नका. त्यामुळे त्या लोकांनी काठ्या व दगडाने गंभीर मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गु्न्हा दाखल केला होता. हा खटला बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरु होता.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे फिर्यादी, दोन जखमी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर असे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या वताने अॅड. विशाल बर्गे यांनी युक्तीवाद केला. फिर्यादी व साक्षीदारांना झालेल्या जखमा व जप्त केलेली हत्यारे, तसेच घटना घडली तेव्हा साक्षीदार क्रमांक तीन हा घटनास्थळी हजर नसल्याचे स्पष्ट करणारा युक्तिवाद त्याचबरोबर जखमींच्या शरीरावर झालेल्या जखमा या केवळ शरीराच्या एकाच बाजूस झाल्या आहेत. त्या जखमा मोटार सायकलवरून पडल्यावर होऊ शकतात. या बाबत वैद्यकीय पुरावा सुद्धा या बाबतीत आरोपीच्या बचावाला दुजोरा देणारा आहे याकडे अॅड. बर्गे यांनी कोर्टाचे लक्ष वेधले.
आरोपीचे वकील श्री अँड विशाल बर्गे यांनी खटला दरम्यान कोर्टात कागदपत्रे सादर केली. त्यानुसार आरोपीने दोन दिवस अगोदर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात याच फिर्यादीच्या वडीलांचे विरुद्ध मारहाण व चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या बाबत तक्रार दिली होती. त्यांच्या चौकशीकामी पोलिसांनी त्यांना बोलवले होते. यांचाही राग फिर्यादी कुटुंबियांना आला होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून केवळ त्रास देण्यासाठी फिर्याद दिली असावी, असा अॅड. बर्गे यांनी युक्तिवाद केला. घटनेबाबत फिर्यादी व साक्षीदार यांच्यात एकवाक्यता नाही नसल्याचेही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. अॅड. बर्गे यांचा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने आरोपीची या खटल्यातून मुक्तता केली.