राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर देहू ते पंढरपूरपर्यंत ठीकठिकाणी दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करावी, तसेच दौंड तालुक्यातील रोटी घाटात विठ्ठल रुक्माई तसेच ज्ञानोबा – तुकाबांचे भव्य दिव्य असे शिल्प उभारण्यात यावे. अशी मागणी पालखी विश्वस्त भानुदास मोरे यांनी केली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूर ते देहूकडे परतीचा प्रवास करीत आहे. दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील मुक्काम आटपून रविवारी (दि ९) हा पालखी सोहळा पाटस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात विसाव्यासाठी दाखल झाला. दरम्यान, रोटीच्या घाटात या तुकोबाच्या पालखीची आरती घेण्यात आली.
यावेळी बोलताना पालखीचे विश्वस्त भानुदास मोरे म्हणाले की, शासनाने पालखी महामार्गाचे रुंदीकरण अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे. या महामार्गामुळे पालखीचा प्रवास हा सुखकर व सोयीस्कर होत आहे. या महामार्गामुळे भाविक भक्तांना चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र शासनाने देहू ते पंढरपूर पर्यंत पालखी मार्गालगत दोन्ही बाजूने सावली देणारे मोठी वृक्षांची लागवड करावी, त्यामुळे भाविकांना या झाडांखाली विसावा घेता येईल तसेच या मार्गाचे नैसर्गिक सौंदर्यात भर पडेल.
जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळयाला देहू ते पंढरपूर या पर्यंत प्रवास करताना दौंड तालुक्यातील रोटी घाट हा एकमेव घाट लागतो. या रोटी घाटात पालखीची महाआरती होत असते. त्यामुळे शासनाने त्या ठिकाणी वारकरी पायी जात असल्याचे शिल्प उभारावे. रोटी घाटात भाविकांना विश्रांती घेता येईल त्यासाठी बैठकी व्यवस्था करावी. अशी मागणीही मोरे यांनी यावेळी शासनाकडे केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळाच्या पुढच्या वर्षीच्या आगमनापूर्वी शासनाकडून याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.