बारामती : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये चांगली नोकरी, पण रविवारची सुट्टी होती, म्हणून मावशीला सोबत घेऊन तो ऊस लागवडीसाठी शेताकडे निघाला. समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने केवळ अपघात घडवला नाही, तर त्याच्या आयुष्याचा सारा खेळ बिघडवला.
ही घटना पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर निरा ते वाल्हे या गावाच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावर घडली. निरा डावा कालव्याच्या पुलानजीक घडलेल्या या घटनेत दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील किरण रामदास धुमाळ या 28 वर्षीय युवकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
त्याच्या समवेत असलेली त्याची मावशी मीना कांतीलाल दरेकर यादेखील जखमी झाल्या आहेत. दरम्यान या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार किरण धुमाळ हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये नोकरीस होते. रविवारची सुट्टी असल्यामुळे शेतातील ऊस लागवडीचे काम सुरू असल्याने ते मावशीला सोबत घेऊन तिकडे निघाले होते.
निरा डाव्या कालव्याच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी आली असता समोरून शिंदवणे तालुका हवेली येथील दोघेजण दुचाकीवरून आले. या दुचाकी समोरासमोर धडकल्याने यात किरण धुमाळ हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा उपचारापूर्वीच दुर्दैवाने मृत्यू झाला.