जुन्नर – महान्यूज लाईव्ह
सध्याच्या राजकीय अस्थिर वातावरणात व राष्ट्रवादीतील फुटीला वैतागून पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी येणारी २०२४ मधील विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यांच्या या निर्णयाने जुन्नरकरांना धक्का बसला असून बेनके यांनी जाहीर बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला व बेनके कुटुंब अशा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या राजकारणात सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले.
आपण लोकांची विकासकामे करण्यासाठी निवडून गेलो. मात्र माझ्या कुटुंबाला इतिहास आहे. मला निर्णय घेणे खूप अवघड गेले आहे. माझ्या आ्मदारकीला एक वर्षाचा कालावधी आहे, त्या कालावधीत जेवढ्या ताकदीने सेवा करता येईल, त्या ताकदीने करीन. जुन्नरच्या हक्काच्या पाण्यासाठी मी कोणीही असले, तरी त्याविरोधात लढून पाण्याच्या हक्कासाठी काम केले, भविष्यातही असेल याबद्दल वचनबध्द आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मी कुटुंबातील सर्वांशी चर्चा केली, सन २०२४ ची निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नाही. ती निवडणूक आपण लढणार नाही.
वल्लभशेठ बेनकेंचे सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी समाजकार्यात सहभागी होऊन जन्नरकरांची सेवा करू. माझ्या आमदारकीचा एक वर्षाचा कालावधी जुन्नरकरांच्या सेवेत घालविन. लोकप्रतिनिधी म्हणून या खुर्चीत बसण्याचा मला अधिकार नाही. महाविकास आघाडी सरकार असतानाही हक्का्चया पाण्यासाठी स्वकियांशी संघर्ष केला. आता पुन्हा परिस्थिती बदलते का काय असे दिसताच जुन्नरकरांच्या हितासाठी सर्वपक्षीयांना बरोबर घेऊन गेलो.
जुन्नरच्या हितासाठी काम करणार. पण एक महत्वाचे की, शरद पवारसाहेब आमचे दैवत आहेत, नेते आहेत, मात्र त्यांच्यानंतर अजितदादाच आमचा नेता आहे. दोघेही माझ्या हृदयात आहेत. जेव्हा डोक्यात घोळ होतो, तेव्हा हृदयाचे ऐकायचे असते. माझ्यासमोर कोणाकडे जायचे हे आव्हान नाही, मला जुन्नरचा राष्ट्रवादी एकसंघ ठेवणे हे आव्हान आहे. मी राष्ट्रवादी सोडणार नाही. विचारधारा सोडणार नाही, सर्व जातीधर्माला बरोबर घेऊनच काम करणार आहे.