बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीपासून अवघ्या सोळा किमी अंतरावरील तावशी गावातील पुजा जाधव या आठवीतील मुलीची १४ वर्षापूर्वी बलात्कार करून हत्या करण्यात आली. १४ वर्षानंतरही मृत पुजा जाधव न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. महिला सबलीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या समाजाला या दु:खद घटनेची जाणीव करून देण्यासाठी आरोग्यदान परिवाराने ‘ पुजा जाधव स्मृती पुरस्कार ‘ या उपक्रमाची सुरुवात केली. यापुर्वी १० ऑगस्ट २०२१ रोजी या घटनेला बारा वर्षे पुर्ण झाली असताना पहिला पुरस्कार बारामती तालुक्यातील प्रज्ञा काटे या महिला कार्यकर्तीला देण्यात आला. या वर्षी या घटनेला १४ वर्षे पुर्ण होत आहेत.
या वर्षीही समाजातील लढाऊ महिला कार्यकर्तीला हा पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. यासाठी आरोग्यदान परिवाराकडून नामांकने मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र किंवा देशातून कोणीही या पुरस्कारासाठी आपले नामांकन पाठवावे. पुरस्कारार्थीऐवजी इतरांनीही यासाठी नावे सुचवावीत अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. ३१ जुलैपर्यंत नामांकने पाठविण्यासाठीही मुदत असून १० ऑगस्ट रोजी बारामती येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यासंदर्भात आरोग्यदान परिवाराचे संस्थापक घनश्याम केळकर यांच्याशी संपर्क साधावा.