ज्ञानेश्वर रायते : महान्यूज लाईव्ह
असं गमतीने म्हणतात की, रात्रीच्या वेळी लोक झोपतात म्हणून, नाहीतर पवार कुटुंबाने रात्रीचाही दिवस केलाच असता.. पण खरोखरच शनिवारची रात्र तशीच झाली.. कारण राज्यातील इतर महत्त्वाच्या बैठका आटोपून रात्री उशिरा देवगिरीवर पोचलेल्या अजित पवारांचा फोन आज म्हणजे शनिवारी पहाटे दोन वाजता खणखणला.. पोलादपूरच्या घाटात बारामतीतील दोघांचा भीषण अपघात झालेला.. अजित पवारांना ही माहिती पोहोचताच दादांनी झोपेतून उठून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणा पहाटे हलवली…
अजित पवारांच्या एका फोनने पोलादपूर परिसरातील अधिकाऱ्यांना जागी केले आणि त्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलादपूरचे पोलीस महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अर्थात तातडीची मदत मिळेपर्यंत माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील दत्तात्रेय शरद टेके हा युवक मयत झाला होता, सुदैवाने बारामतीचे सात युवक मात्र या अपघातात बचावले.
बारामती येथील कोष्टी गल्लीमधील आठ युवक दोन चारचाकी वाहनाने गोव्याला जात होते. आज शनिवार (ता. ८) रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर घाटामध्ये पाठीमागून भरधाव टॅंकर आला आणि बारामतीच्या या दोन्ही गाड्यांना जोरदार ठोकर देत चिरडले. धडक एवढी जोरात होती की माळेगाव मधील दत्तात्रय शरदत्त्याची या 43 वर्षीय पर्यटकाला गाडीतून बाहेर पडता आले नाही आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली मात्र इतर सात जणही या अपघातात जखमी झाले होते.
अर्थात बचावलेल्या युवकांना रात्रीच्यावेळी काय करावे ते सूचत नव्हते. जखमींपैकी एकाने माळेगावचे कार्यकर्ते रविराज तावरे यांना मोबाईलद्वारे संपर्क केला व झालेल्या दुर्घटनेची माहिती देत मदतीची मागणी केली. पोलादपूरच्या घाटात रात्रीच्यावेळी मदत पोचविणे आव्हानात्मक होते, परंतु तावरे यांनी रात्री दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अपघाताची माहिती कळविली. पवार यांनी घटनेचे गंभीर लक्षात घेत लागलीच झोपेतून उठत तातडीने बारामतीच्या अपघातग्रस्तांना मदत पोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रय़त्न केले.
अजित पवार यांनी थेट रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यातील पोलीस अधीक्षकांना संपर्क साधून तातडीने तत्परतेची मदत पोहोचण्याची सूचना केली पवार यांचा आदेश पोहोचतात शासकीय यंत्रणा कामाला लागली आणि काही वेळातच या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पोचले. जखमी झालेल्या व बचावलेल्या सात युवकांना पुढील वैद्यकिय उपचार देण्याकामी पवार यांनी पुन्हा संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.