सातारा – महान्यूज लाईव्ह
बऱ्याच वर्षांपासून शरद पवार यांच्यावर वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप होतो. गेल्या काही वर्षात त्यांच्यावर दादांच्या पत्नी शालिनीताई यांनीही बऱ्याचदा राजकीय टिका केली, मात्र आजच्या राजकीय परिस्थितीत त्यांनी वापरलेले एक वाक्य महत्वाचं ठरलं.. ते म्हणजे.. शरद पवारांचं बंड स्वार्थासाठी नव्हतं..
महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शालिनीताईंनी हे वाक्य वापरले आणि राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. कारण एकीकडे शरद पवार हेच त्यावेळी राजकीय नेतृत्व करण्यासाठी योग्य होते, त्यामुळे वसंतदादांनी देखील या परिस्थितीतही माझ्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्व स्विकारा असा सल्ला दिला होता.
शालिनीताई म्हणाल्या, अजितदादांची ही चूक आहे. ते भाजपकडे आश्रयासाठी गेले आहेत. संरक्षणासाठी ते गेले आहेत. पण हे लोकशाहीमध्ये कोणाचे अनंतकाळ टिकत नाही. नवे विचार येत राहतात. सत्य हे सत्यच राहते. मोदींच्या पक्षातील महाराष्ट्रातील नेते मोदींना बहुधा सत्य सांगत नसावेत. गुन्हा दाखल करायला उच्च न्यायालय सांगते हे काही साधी गोष्ट नाही.
राष्ट्रवादीतील फूट ही खोटी आहे अशी चर्चा विरोधक करीत आहेत, त्यावर विचारले असता, शालिनीताई म्हणाल्या, शरद पवार असला प्रयोग करीत नाहीत. शरद पवार हे एकेकाळी वसंतदादांच्या विरोधात वागले. त्यावेळी मी विरोधात बोलायचे ते बोलले. पण हे खरे आहे की, जेव्हा शेवटी वसंतदादा राजकारण सोडून राजस्थानचे राज्यपाल होण्यासाठी निघाले, तेव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांना बोलावून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करा असे सांगितले होते. म्हणजेच वसंतदादांना देखील त्यावेळी कॉंग्रेसमध्ये केवळ शरद पवार हेच योग्य नेते असावेत असे वाटले. साहजिकच त्यांचा आदेश मानलाच पाहिजे. मग आम्ही शरद पवारांबरोबर काम केले.
त्या म्हणाल्या, शरद पवारांच्या वागण्याला तात्विक बेस आहे. अजितदादांचे वागणे उथळ आहे. शरद पवारांनी जे सांगितले ते खरे आहे. ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा चिन्ह किंवा काहीही मागितले नाही व नवीन निर्माण केले व स्वतःचे सिध्द केले. मग तुम्हाला बाहेर पडायचे आहे, तर नवीन काहीतरी करावे. नव्या पिढीला लगेच पाहिजे व सोपे पाहिजे.
राजकारणातील बदल विचित्र आहेत. त्या काळात शरद पवारांचे बंड होण्यामागे काही विचार होता. आताचे बंड हे सत्तेसाठी होते. केलेल्या अपराधाला झाकण्यासाठी संरक्षण पाहिजे व त्यासाठी लोकांना सत्तेत जायचे आहे. पण शरद पवार हे फार मुत्सद्दी आहेत. धूर्त आहेत. ते कोणालाही माफ करीत नाहीत. यासाठी सन २०२४ पर्यंत वाट पाहण्याचीही गरज नाही.