नाशिक महान्यूज लाईव्ह
अपेक्षेप्रमाणे आज येवल्यात शरद पवार यांची तुफान सभा झाली. सभेनंतर येवल्याच्या बाजार समितीच्या पटांगणात अमोल कोल्हे, रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांभोवती प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांनी केली.. या अभूतपूर्व स्वागताने सारेच भारावले. विशेष म्हणजे या सभेसाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
या सभेत पवार यांनी मोजून सात मिनीटेच भाषण केले. पण त्यांनी माफी मागण्यासाठी आलोय असे म्हणत येथील उपस्थितांच्या काळजाला हात घातला. ते म्हणाले, राजकारणात अनेक चढउतार येतात, अनेक संकटांत लोकांनी माझी साथ सोडली नाही. माझा अंदाज चुकला म्हणूनच माफी मागायला आलो आहे.
येथील जनतेने नेहमीच पुरोगामी विचारांना साथ दिली आहे. ऐक्यासाठी प्रयत्न करणाऱ्या्ंची ही भूमी आहे. स्वातंत्र्यचळवळीत हा जिल्हा सातत्याने अग्रभागी राहीला. हा देश परकीयांच्या हातून सोडविण्यासाठी येथील लोक नेहमीच पुढे राहीले. या स्वाभिमानी लोकांपुढे मी सांगतोय की, अशी चूक पुन्हा होणार नाही. मी कोणावर टिका करण्यासाठी नाही, मी माफी मागायला आलो आहे.
जे त्यांनी आरोप केले आहेत. ते आरोप वेगवेगळ्या प्रकारचे असतील, मी जाहीरपणाने सांगतो की, तुमच्या हातात देशाची सत्ता आहे, आमच्यापैकी कोणीही असे वाटत असेल, तर तुमची असेल, नसेल ती सत्ता वापरा. जर चुकीच्या मार्गाने गेलो असेल, तर कारवाई करा, पण काही लोक म्हणतात की वय झालं. वयाचा उल्लेख कराल, तर महागात पडेल.