बारामती : महान्यूज लाईव्ह
तब्बल 40 वर्षाहून अधिक काळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासापासून ते 40 वर्षापर्यंत त्यांना साथ देणारे व आता त्यांचे कडवे विरोधक असलेले सहकारातील नेते माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी आता राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे
चंद्रराव तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीतील फूट हे पवार कुटुंबाचे नाटक असून कुटुंब वाचवण्यासाठी केलेल्या हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपण त्यांना खूप जवळून ओळखतो. त्यामुळे हे सर्व नाटकच असल्याचे त्यांचे मत असून येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल असे चंद्रराव तावरे यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने अत्यंत मोठी चूक केली असून ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा हाताशी धरून दुसऱ्या पक्षातील नेते आपल्या पक्षात घेऊन फार मोठी घोडचूक केली आहे आणि त्याचा त्याची किंमत भारतीय जनता पक्षाला मोजावी लागेल. भारतीय जनता पक्षाने केवळ बारामतीचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे नुकसान केले आहे असा आरोप देखील त्यांनी लावत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
ते म्हणाले सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत विचित्र व चुकीची आहे. शरद पवार यांनी सुरुवातीच्या काळात अत्यंत चांगले काम केले. 18-18 तास काम केले. जशी जशी राजकीय सत्ता मिळेल. तशी तशी त्यांची वर्तन बदलत गेले. पवारांचे राजकारण कोणालाच लवकर कळणार नाही असा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला आहे.
जर भारतीय जनता पक्ष ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, तर या तपासी यंत्रणांना कोणामुळे बळ मिळाले? आपण त्यात का पडलो? असा विचार अजित पवार यांच्यासारख्यांनी करायला हवा. मोठे घोटाळे असल्यामुळेच त्यांच्यामागे यंत्रणा पडतात असाही आरोप तावरे यांनी लगावला आहे.
तावरे हे शरद पवार यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीपासून त्यांच्याबरोबर होते. मधल्या खंडात आपल्याला पवार यांच्याजवळ असल्यामुळे काहीजणांनी त्यांच्यापासून दूर लोटण्यासाठी प्रयत्न केले आणि तेथूनच आपण त्यांच्यापासून दूर झालो असे चंद्रराव तावरे म्हणाले.
आता जुन्या सहकाऱ्यांना आवाहन करण्याचा प्रयत्न होईल, पण आम्ही आहोत तिथेच आहोत. आम्ही भारतीय जनता पक्षाचेच काम करणार आहे असा पुनरूच्चार चंद्रराव तावरे यांनी केला. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत काय होईल? असा प्रश्न विचारल्यावर त्यावर त्यांनी अजून दीड वर्षाचा कालावधी आहे, आत्ताच त्यावर बोलणे उचित नाही असे मत व्यक्त केले.