गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नागरिकांचा नकार.. पोलीस ठाण्यात नागरिकांचा ठिय्या..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरात स्ट्रीट लाईटच्या खांबाला वीजेचा धक्का लागून ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहरातील दर्गा मस्जिद चौकात ही घटना घडली आहे.कुलसूम हैदर मुशाहिदी असे या मृत मुलीचे नाव आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी नगरपालिका व महावितरणच्या निष्काळजीपणाचा हा बळी गेल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत महावितरण व नगरपरिषदेच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नागरिकांनी नकार दिला.
दरम्यान सदरच्या घटनेनंतर चिमुकलीला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील कारवाईसाठी कुलसूमला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. सदर घटनेत या चिमुकलीचा कान आणि पाठीला जखम झाली आहे. घटना घडल्यानंतर महावितरणने संबंधित ठिकाणची लाईट कनेक्शन बंद केले असून, तपासणीअंती खांबाला करंट असल्याची तक्रार नागरिकांची आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही लाईटच्या खांबांना नगरपरिषदेकडून डीडबल्यूसी फायबरच्या संरक्षक पाईप्स का लावण्यात आल्या नाहीत? वेळोवेळी खबरदारी का घेण्यात येत नाही? असा सवाल नागरिकांचा आहे. संतप्त घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, संबंधित महावितरण आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इंदापूर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांनी ठाण मांडले आहे.
घटना घडलेल्या ठिकाणाच्या चौकात लाईटचा डीपी आहे. नेहमी गर्दी असलेल्या या चौकातील हा डिपी धोकादायक असल्याने इतर ठिकाणी हलवला जावा अशी मागणी अनेकवेळा स्थानिकांकडून केली गेली आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे महावितरण तथा नगरपरिषदेला नेमकं काय अपेक्षित आहे असा सवाल उपस्थित होत आहे.