मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर चुलते शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यातील संघर्षामध्ये अचानकच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने भावनिकतेची लहर पसरली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मेळाव्यातून बाहेर पडताना शरद पवार यांच्या गाडीत असलेल्या प्रतिभा पवार यांच्या डोळ्यातील अश्रू टिपत तो फोटो शेअर करून या आसवांना आनंदाश्रूत बदलायचे आहे असा मेसेज दिला आहे.
गेल्या दोन चार दिवसात अजित पवार यांच्या बंडामुळे पवार कुटुंबात पडलेली फुट राज्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या भावना अनावर करून गेली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा धक्का जबरदस्त मानला जात आहे. त्यातच जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिभा पवार यांचा फोटो सोशल मीडियात ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील हा फोटो असल्याचे सांगितले जात असून, यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावल्यानंतर शरद पवार हे बैठकीसाठी निघाले होते. त्यावेळी प्रतिभा पवार त्यांच्यासोबत होत्या. यावेळी कारच्या खिडकी बाहेरून हा फोटो काढण्यात आला. फोटोमध्ये शरद पवार हात दाखवून कारबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करत असताना बाजूला प्रतिभा पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे या फोटोत दिसत होते.