इंदौर : महान्यूज लाईव्ह
मध्यप्रदेश मधील दोन दिवसांपूर्वी घडलेल्या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण देशातच संतापाची लाट असतानाच, आता मुख्यमंत्र्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे पीडित आदिवासी तरुणाला बोलावून घेऊन त्याचे पाय धुताना दिसत आहेत आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी प्रवेश शुक्ला याने दारू पिऊन मध्यप्रदेश मधील आदिवासी तरुण दशमत रावत त्याच्या अंगावर लघुशंका केली होती. या घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या संदर्भात इतर आरोपींवर बुलडोझरची कारवाई होते, परंतु या आरोपीवर कारवाई होणार का? असा प्रश्न देखील देशात विचारला गेला.
सुरुवातीला त्याने अतिक्रमण केले की नाही हे पाहावे लागेल असे स्थानिक आमदाराने सांगितले, पण जनमताचा रेटा आणि संतापाची जनभावना लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या घरावरही बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत या प्रकरणाचे पडसाद अत्यंत विपरीत होतील हे लक्षात येताच प्रवेश शुक्ला याला तातडीने अटक करण्यात आली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दशमत रावत यास घरी बोलावले आणि त्याचे पाय धुवून त्यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितले की, हा व्हिडिओ मी अशासाठी शेअर करतो आहे की, सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असला तरी जनता भगवान आहे. कोणावरही अत्याचार सहन केला जाणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान हाच माझा सन्मान आहे.