मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबई महापालिकेत कोविड काळात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते करत आहेत. मुंबई महापालिकेच्या जवळ आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संदर्भातील आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत अशातच उद्धव ठाकरे यांनी देखील एक पलटवार करत भाजपवर टीका केली आहे.
मुंबईत एका वृत्तपत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी बोलता बोलता ही आठवण करून दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील घोटाळ्याची चौकशी करत आहात तर पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर त्यांनी राज्यात सध्या अत्यंत विचित्र परिस्थिती असल्याचे मत व्यक्त केले.
ते म्हणाले कोरोना काळात मी एकटा लढत नव्हतो, सगळेजण लढत होते. पण एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे कोरोनाच्या काळात भ्रष्टाचार झाला अशी ओरड करत जे चौकशीची तुतारी वाजवत आहेत, त्यांनी भ्रष्टाचार काढावा. जरूर काढावा. पण कोरोनाच्या काळात अख्खं जग चिंताग्रस्त असताना मुंबईने एक आदर्श जगासमोर ठेवला होता. जग कौतुक करत असताना राज्यात कौतुक करायला हृदय मोठे लागतं पण जर त्यांच्यातील माणूसच मेला असेल तर त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षाच नाही.
कौतुक केलं नाही तरी चालेल, बदनामी का करता? बदनाम करताना मुंबई महापालिकेतील कोविड काळातील गैरकारभाराची चौकशी करणार असाल, तर देशातील सर्व सरकारांची पूर्णपणे चौकशी करा. कोविड काळातील चौकशी करणार असाल, तर पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा, कारण जनतेला हा पैसा गेला कुठे हे कळले पाहिजे.
ते म्हणाले, अनेकांना आता मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण पदे येतात आणि जातात. माणूस महत्त्वाचा. माणूस म्हणून जी ओळख मिळालेली असते ती फार महत्त्वाची असते. त्या ओळखीचा उपयोग आपण आपल्या पदाला करून देणे गरजेचे असते. हल्ली ज्या माणसाने शिल्प घडवलं, त्या शिल्पकारांनाच पळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
स्वतःचं काही कर्तृत्व नसते, अशावेळी स्वतः शिल्पकार होऊ शकत नाही, म्हणून तोच पळवून न्यायचा अशा प्रकारची विचित्र परिस्थिती सध्या राज्यात सुरू आहे. ज्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काही संबंध नव्हता, अशी विचारसरणी आज देश ताब्यात घेऊ पाहत आहे अशी देखील टीका त्यांनी केली.