बारामती: महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समिती व करिअर कट्टा अंतर्गत पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रातून पोलीस उपनिरीक्षक पदावर करिश्मा वणवे, रूपाली गरगडे, शितल उत्तेकर, अक्षय पवार, शरद भरणे, अजयसिंह भाळे या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली.
मागील दोन अडीच महिन्यांपूर्वी ११० हून अधिक विद्यार्थ्यांची पोलीस शिपाई या पदावर निवड झाली होती. त्यानंतर आता सहा विद्यार्थी फौजदार बनले आहेत. गेल्या ५ वर्षात विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील १७८ विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक, तहसीलदार, लेखाधिकारी, विक्रीकर निरिक्षक, लेखापरीक्षक, पोलीस काॅन्स्टेबल आदी पदावर उत्तीर्ण झाले आहेत.
स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले, विशाल चव्हाण व स्पर्धा परीक्षा समितीतील सर्व सदस्यांनी यासाठी गेली दोन तीन वर्षे खूप कठोर मेहनत घेतली. त्यांचे प्राचार्य डॉ. शिंदे यांनी कौतुक केले. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ. लालासाहेब काशीद, निलीमा पेंढारकर, विशाल चव्हाण आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.