आमदार दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची साथ सोडून भाजपाच्या सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. अशावेळी अजित पवारांना साथ देणाऱ्या आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवारी (दि.७) दुपारी एक वाजता इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक इंदापुरात होत आहे.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री व तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीला प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांना मानणारा तसेच अजित पवार यांना मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात आहे. अशा परिस्थितीत आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी अजित पवारांना साथ दिल्यानंतर इंदापूरात हालचाली सुरू झाल्या आहेत. या तातडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याविषयी विनंती करण्यात आली आहे.