राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखणार ? राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या कोणत्या मतदारसंघात दावा करणार ? याकडे पुणे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्ती सहकारी मानले जातात. त्यामुळे 90 जागा आपल्याला मिळणार आहेत असे अजित पवार यांनी भाषणात सांगितले, त्यानुसार दौंड ची जागा अजित पवार राष्ट्रवादीसाठी मागू शकतात अशी कालपासूनच चर्चा सुरू झाली आहे. रमेश थोरात यांच्यासाठी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंड विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यास काय होणार आणि दौंड ची जागा कोणासाठी धोक्याची घंटा ठरणार याची चर्चा कालपासून सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय माजी कृषिमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बंड करीत आपल्या समर्थकांसह भाजप शिवसेना यांच्या सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचे परिणाम राज्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही स्पष्टपणे लागले आहेत.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि महानंदा दूध संघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांच्यासह थोरात समर्थकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने काल त्यांनी अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहून हजेरी लावली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी नेहमीच कुल घराण्याला सहकार्य केल्याचे दबक्या आवाजात सांगितले जाते. माजी आमदार रंजना कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट देऊन आमदारकीही दिली होती. तर भीमा पाटस सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांच्याशी त्यांनी नेहमी जवळीक साधली आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नेहमीच आमदार कुल यांना छुप्या पद्धतीने पाठिंबा देऊन सहकार्य केल्याची चर्चा दौंड तालुक्यात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड विधानसभेचे उमेदवार रमेश थोरात असतानाही थोरात यांना शरद पवार व खासदार सुळे यांनी पाहिजे तेवढी मदत केली नसल्याचे थोरात समर्थकांकडून खुलेआमपणे बोलले जाते. त्यांच्या नाराजीचा फटका खासदार सुळे यांना मागील दोन लोकसभा निवडणुकीत बसला आहे.
त्यामुळेच माजी आमदार रमेश थोरात यांनी व त्यांच्या समर्थकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड शहराध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह मोजक्याच काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यातून दौंड राष्ट्रवादीमध्येही फूट पडली असून या फुटीचा पूर्ण फायदा भाजप आमदार राहुल कुल घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी केली असल्याची चर्चा तालुक्यात आहे. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात आहे आणि अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघावर बारकाईने लक्ष असून मजबूत पकड आहे.
सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्या सत्तेत सहभागी झाल्याने ते आता त्यांचे मित्र झाले आहेत. त्यामुळे अजित पवार हे पुणे जिल्ह्यात आपला बालेकिल्ला शाबूत राहण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने रणनीती आखण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने दौंड विधानसभेसाठी आपले निष्ठावंत सहकारी दौंड चे माजी आमदार रमेश थोरात हे आगामी विधानसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात.
अजित पवार यांनी दौंड विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यास आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सोडल्यास ती भाजप आमदार राहुल कुल यांच्यासाठी मोठी अडचण ठरू शकते, अर्थात या जर तर च्या घटना आहेत, कारण भाजप आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्ती मानले जात आहे. त्यांनी आमदार कुल यांना विधानसभेचे हक्कभंग समितीच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यामुळे भाजप त्यांच्या हक्काचा उमेदवार आणि विजयाची मोक्याची जागा असलेली दौंड विधानसभा कधीच सोडू शकणार नाही.
मात्र, मध्यंतरी शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार कुल यांच्यावर भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या कथित पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करीत दौंड तालुक्यातील वरवंड येथे प्रचंड मोठी सभा घेतली होती. भीमा पाटस कारखान्याच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांनी ईडी व सीबीआय कार्यालयातही आमदार कुल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे हे आमदार कुल सध्या अडचणीत सापडले होते.