मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या चार-पाच दिवसात राष्ट्रवादीमध्ये झालेली फुट ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील काही नवीन खेळ असावी असे ज्यांना ज्यांना वाटत होते, त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज खुद्द अजित पवार यांच्या भाषणाने उत्तर मिळाले. शरद पवार आपले आदर्शच आहेत असं ठामपणे सांगतानाच त्यांनी शरद पवार यांनाही प्रतिप्रश्न करत प्रत्येक वेळी आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला.
अजित पवार यांनी आज एम इ टी मध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावरही टीका केली. त्यांनी शरद पवार यांच्यावर पुलोदच्या पासून आजपर्यंतच्या अनेक घटनांचा उल्लेख करत यामुळेच ही वेळ आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आपण सुप्रिया देखील सांगितले होते, आता वय 82, 83 च्या वर गेले आहे, तेव्हा समजून सांगावे. आपण एका कुटुंबातील आहोत. साहेबांनी देखील सांगितले होते की, मी आता राजीनामा देतो आणि मी संस्था पाहतो, पण पुन्हा असे काय घडले की राजीनामा त्यांनी मागे घेतला?
आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे आणि राष्ट्रवादीची आजवरची सर्वोच्च 71 आमदारांची संख्या होती, ती शंभराच्या पुढे न्यायची आहे, त्यासाठी आपण जीवाचे रान करू असा शब्द अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देतानाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच राहणार असल्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे या पुढील काळात देखील राष्ट्रवादीची एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यासारखीच लढाई राष्ट्रवादीमध्येही सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत.