शिरूर : महान्यूज लाईव्ह
सर्वसाधारण परिस्थिती…त्यातही लेकीने जिद्द धरली…बाप गुरू झाला अन् केलेल्या कष्टाचे चीज ही झाले.लेकीने गावात पहिली पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला अन् बापाचे गगन ठेंगणे झाले…शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील प्रज्ञा जनार्दन गायकवाड या मुलीची ही यशोगाथा.
प्रज्ञा गायकवाडची घरची परिस्थिती तशी सर्वसाधारण. लेक पोलिस उपनिरीक्षक करायचीच हे वडिलांचे स्वप्न होते. ते लेकीने सत्यात उतरवले. प्रज्ञा हिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर काही वर्षे पुण्यात हडपसर येथे शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण कर्वेनगर येथील महीलाश्रम संस्थेत घेतले.
बारावी पर्यंतचे शिक्षण श्रीगोंदा येथे पूर्ण केल्यानंतर शिरूर येथील सी टी बोरा महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण केले. पोलिस उपनिरीक्षक व्हायचेच हे वडिलांचे स्वप्न असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
सन २०१८ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी कठोर मेहनत घेत परीक्षा घेतली, मात्र त्यात केवळ एका गुणाने थोडक्यात संधी हुकली. यावेळी मनोबल खचले असताना आई व वडिलांनी पुन्हा उमेद देत तयारी करण्याचा सल्ला दिला. प्रज्ञाने पुन्हा सर्व विसरून अभ्यासास सुरुवात केली. सन २०२० मध्ये आलेल्या संधीसाठी जोरदार तयारी करत परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदावर नाव कोरले.
या यशाबद्दल बोलताना प्रज्ञा हीने सांगितले की,वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली.अडचणी खूप होत्या, मात्र वडील हेच गुरू असल्याने प्रत्येक अडचणींवर मात करता आली. आई वनिता व भाऊ वैभव यांनी दिलेल्या पाठबळामुळे स्वप्न साकार करता आल्याचे सांगितले. तर वडील जनार्दन यांनी मुलगी गावात पहिली पोलिस उपनिरीक्षक झाली याचा मोठा आनंद असल्याचे सांगितले. शिरसगाव काटा येथे गावात पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक झाल्याने गावात प्रज्ञा हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.