राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्या एका गटाने अजित पवार यांच्या सभेला उपस्थित राहून थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील असल्याचे संकेत दिले आहेत.
दौंड राष्ट्रवादीचा मोठा गट अजित पवार यांच्याकडे गेल्याने हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करीत भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना यांच्यात सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकीय भूकंप घडवून आणला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. राज्यातील बदलत्या या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील वातावरण पुर्णपणे ढवळून निघाले आहे.
शरद पवार यांनी काल सातारा येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जनतेपर्यंत आणि तळागाळात पोहोचवण्यासाठी नव्या जोमाने नेण्याचा निर्धार केला. शरद पवार व अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा प्रतिदावा करीत दोन्हीही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच असल्याचे सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जायचे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाऊन सत्तेत सहभागी होयचे याबाबत ते कात्रीत सापडले होते, मात्र आता दौंडचे माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, दौंड शुगरचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला उपस्थित राहून थेट अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचे एक प्रकारे स्पष्ट संकेत दिले आहेत.
त्यामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादीला विशेषतः बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्यासोबत माजी आमदार रमेश थोरात यांनी तालुक्यातील विविध विकास कामे व तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार सुळे यांनी दिले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष मानला जात होता. मात्र,आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी अजित पवार यांच्या गोटात उडी मारली. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्यात आघाडी मिळण्याची शक्यता नाही. हे खासदार सुळे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचे असून मोठा धक्का मानला जात आहे.