सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये येऊन अजित पवार हे सहभागी झाले असून, शिवसेना- भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद व त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदे दिली आहेत. इंदापूरची जागा ही शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपची होती व भाजपकडे राहणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराला खुद्द अजित पवार येथील असे जोरदार प्रत्युत्तर भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांना दिले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा थेट संघर्ष सर्वांना माहित आहे. नुकताच अजित पवार यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे विश्वासू तसेच विद्यमान आमदार असणाऱ्या ‘दत्तात्रय भरणे यांचा प्रचार हर्षवर्धन पाटील करतील’ असे विधान केले होते. त्यांच्या विधानाला भाजपने फटकारले आहे. हर्षवर्धन पाटलांच्याच प्रचाराला खुद्द अजित पवार येथील असे सांगत जामदार यांनी आव्हान दिले आहे.
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सन 2019 च्या विधानसभेपासून पुणे जिल्ह्यात व इंदापूर तालुक्यात भाजप पक्ष वाढविण्याचे काम करीत आहेत. इंदापूरची जागा ही शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपकडे आहे व आगामी निवडणुकीत भाजपकडेच राहणार हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचाच प्रचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी पत्रकारांना दिली.
ॲड.जामदार म्हणाले, की राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे गतिमान सरकार एक वर्षापासून बहुमताने कार्यरत आहे. या शिवसेना- भाजप युतीच्या सरकारमध्ये येऊन अजित पवार हे सहभागी झाले असून, शिवसेना- भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद व त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदे दिली आहेत.
त्यामुळे इंदापूरची जागा ही शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपची होती व भाजपकडे राहणार आहे.
राष्ट्रवादीच्या इंदापूर तालुकाध्यक्षांनी विधाने करण्याअगोदर ते अजित पवार यांचे पक्षाबरोबर आहेत की ज्येष्ठ नेते शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहेत हे निश्चित करावे आणि मगच बोलावे असा मौलिक सल्लाही जामदार यांनी हनुमंत कोकाटे यांना दिला आहे.