मुंबई : महान्यूज लाईव्ह
बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळच्या झालेल्या अपघातानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनावर टीका करताना, गावात कोणी अपघातात गेला तर तो देवेंद्रवासी झाला असे म्हटले जाते , अशा प्रकारची टीका केली. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत पलटवार केला आहे.
बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख करत त्यावेळी मृत पावलेले सारे जण शरदवासी झाले असे आम्ही म्हणायचं का? असा सवाल केला आहे.
बावनकुळे यांनी काय म्हटले आहे?
पवारसाहेब, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले. पवार गोवारी विसरले! पवार मावळचा गोळीबार विसरले..! पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले.! हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले.
बावनकुळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता शरद पवार त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे. मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही.