बुलढाणा घटनेत शिरूर शहरातील तिघांचा मृत्यू ; शिरुरकर झाले सुन्न
शिरूर : महान्यूज लाईव्ह
बुलढाणा बस अपघातात मूळचे शिरूर शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शिरूर शहर सुन्न झाले. बुलढाणा जिल्ह्यात बस अपघातात कैलास गंगावणे, कांचन गंगावणे, डॉ. सई गंगावणे यांचा मृत्यू झाला.शिरूर शहरातील हसत्या खेळत्या कुटुंबातील तिघांचा बुलढाणा जिल्ह्यात बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिरूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.निधनाची वार्ता कळताच कुटुंबीयांसह संपूर्ण शिरूर शहर शोकसागरात बुडाले.
याबाबत सविस्तर असे की, मूळचे शिरूर शहरातील गंगावणे कुटुंबातील शिक्षक असलेले कैलास गंगावणे हे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत होते.नोकरीनिमित्त ते तात्पुरते स्थायिक झाले होते. मात्र शनिवारी,रविवारी व सुट्ट्याना ते गावी शिरूर ला येत असत.
कैलास गंगावणे हे त्यांचा मुलगा आदित्य याचे नागपूर येथील सेवा विधी महाविद्यालय येथे प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी पत्नी कांचन (वय.३८) तसेच मुलगी सई (वय.२०) यांसह नागपूर येथे गेले होते.तत्पूर्वी नागपूर कडे जाताना शिरूर येथील त्यांच्या घरी बुधवारी दुपारी त्यांची स्वतःची कार त्यांनी लावली.
संध्याकाळी ट्रॅव्हल्सने शिरूर बायपास येथून ते नागपूर येथे गेले होते. शुक्रवारी परत येत असताना मध्यरात्री अचानक काळाने झडप घातली अन् क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाले. माघारी येत असताना बसचा अपघात झाला अन् त्यात कुटुंबातील तिघांचा ही दुर्दैवी मृत्यू झाला.
पहाटे साडेपाच दरम्यान शिरूर येथील कुटुंबीयांना बस अपघाताची माहिती मिळाली. यावेळी कुटुंबीयांनी कैलास यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुःखद माहिती कळताच संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले.
दुर्दैवी घटनेतील कैलास गंगावणे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांना सुरेश हा भाऊ असून बबन गंगावणे, अविनाश सांगळे हे भाचे आहेत. गरीब परिस्थितीतून शिकून मोठ्या झालेल्या या कुटुंबातील हे तिघेही शिक्षक आहेत. हसत्या खेळत्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे तर मृतांची ओळख पटविण्यासाठी सुरेश हे तातडीने बुलढाणा येथे पोहोचले आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी तातडीने कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. बुलढाणा जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्याशी पवार यांनी संपर्क साधत मदतीची विनंती केली, यावेळी गाजरे यांनीही नातेवाईकांना सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचे सांगितले. आमदार अशोक पवार यांनी विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून अपघातातील मृतांची लवकरात लवकर ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणेसाठी विनंती केली.