मुंबई : महान्यूज लाईव्ह
शनिवारी पहाटेपर्यंतच्या काळात वाढदिवस वर राज्यातील तब्बल 45 जणांनी रस्त्याच्या अपघातात आपला जीव गमावला त्यामध्ये एकट्या समृद्धी महामार्गावर 29 जण देवाघरी गेले.
विदर्भ ट्रॅव्हल्स या खाजगी बसचा राज्याला हादरवून सोडणारा अपघात झाला. आज पहाटे सिंदखेडराजा नजीक पिंपळखुटा गावानजिक समृद्धी महामार्गावर पहाटेच्या वेळी अचानक टायर फुटून हा अपघात झाला, त्यामध्ये तब्बल 26 जणांनी आपला जीव गमावला. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
तर याच महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीप आणि टेम्पोच्या धडकेत राठोड कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तिघेजण एकाच कुटुंबातील असून, पती-पत्नी व दीड वर्षाच्या मुलाने यामध्ये जीव गमावला. हे तिघेही जालना जिल्ह्यातील मंठा येथील रहिवासी होते.
आज पहाटे बुलढाण्यात जो अपघात झाला, त्याच्या आधीच काही तास अगोदर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे ट्रक आणि खाजगी बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये गर्भवती महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत आठ जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज पहाटे सिंदखेडराजा नजीकची घटना घडली.
सातारा पुणे महामार्गावर शिरवळ नजीक ट्यूब कंपनीच्या समोर कंटेनरला ट्रॅव्हल्स ने पाठीमागून जोरात धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे शिरवळनजिक झाला. याखेरीज सोलापूर जिल्ह्यातही तब्बल सहा जणांना आज आपला जीव गमावा लागला अक्कलकोट जवळ क्रुझर आणि टँकरच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.