शिरूर : महान्यूज लाईव्ह
आज पहाटे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा नजीक पिंपळखुटा इथं विदर्भ ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला आणि 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी धडकली. साऱ्यांनाच हळहळ वाटली; पण काही वेळातच जेव्हा यात एक कुटुंब हे शिरूर तालुक्यातील आणि बारामतीशी निगडित हे होतं; हे जेव्हा समजलं तेव्हा अख्खा पुणे जिल्हा हादरून गेला, कारण या घटनेत मुलगा सोडला तर संपूर्ण हसतखेळतं कुटुंब संपलं.
समृद्धी महामार्गावरील या अपघातात पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. कैलास गंगावणे, कांचन गंगावणे आणि मुलगी डॉ. सई गंगावणे या तिघांचा मृत्यू झाला. कैलास गंगावणे हे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.
या घटनेतील बहुतांश मृतदेह हे ओळखण्याच्या पलीकडे गेले होते. त्यामुळे डीएनए वरूनच त्यांची ओळख पटणार होती. कांचन या बारामतीच्या काळे कुटुंबातील! त्यांचे बंधू आणि बारामतीतील प्रसिद्ध वकील अमर काळे यांना हा निरोप गेला, तेव्हा संपूर्ण बारामतीत शोककळा पसरली.
अगदी वाऱ्याच्या वेगाने अमर काळे हे बुलढाण्याकडे रवाना झाले, कारण डीएनए वरूनच मृतदेह कोणाचे हे शोध जाणार होतं. मात्र असा प्रसंग का यावा याच प्रश्नानं आज बारामतीकरांच्या मनात चिंतेचं काहूर पसरलं होतं.
ज्याच्यासाठी सर्व कुटुंब तिकडे गेले होते, तो आदित्य येथे काही वर्षातच वकील होईल, आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करेल, पण ते पाहायला त्याचेच आई-वडील या दुनियेत नसतील. या वास्तवाने आणि चिंतेने देखील आज अनेकांच्या पापण्या ओलावल्या. गंगावणे सर हे महाविद्यालयात असणारे परिसरातही चांगलेच परीचित होते. त्यांच्या स्वभावामुळे ते सर्व मित्र परिवारामध्ये परिचित होते.
अपघात घडल्याची बातमी धडकली आणि इकडे अमर काळे आपल्या मेहुण्यांना व बहिणीला फोन लावत होते. मात्र फोन लागत नव्हता त्यानंतर अमर काळे यांनी बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला, तेव्हा अत्यंत दुर्दैवाचा धक्का त्यांनाही बसला. कारण विदर्भ ट्रॅव्हल्स बसच्या या प्रवासात असलेल्या यादीमध्ये गंगावणे कुटुंबाचे देखील नाव होते आणि त्यांचे शेवटचे लोकेशन हे अपघातस्थळावरच दिसून आलेले होते. त्यामुळे अमर काळे यांनी तातडीने बारामती सोडली आणि ते बुलढाण्याकडे रवाना झाले, तर दुसरीकडे निरगुडसर येथील गंगावणे सर शिकवत असलेल्या महाविद्यालयातील शोककळा पसरली होती. महाविद्यालयाने तातडीने सुट्टी जाहीर केली.