जालना – महान्यूज लाईव्ह
मागील आठवड्यात जो प्रकार घडला होता, त्यामध्ये कार अचानक पेटली आणि बायको नवऱ्याच्या डोळ्यासमोर होरपळून मेल्याची घटना परतूर तालुक्यातील कारळा येथील दांपत्याच्या बाबतीत घडली होती, मात्र पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने सारेच हेरले आणि जे बाहेर आले, ते गावाला हादरवणारे होते.
कारळा गावातील अमोल गंगाधर सोळुंके यानेच त्याची पत्नी सविता अमोल सोळुंके हिची हत्या केल्याचे पोलिसांनी तपासातून उघड केले आहे. लग्नाला १० वर्षे उलटल्यानंतरही मूल होत नसल्याच्या कारणातून संतापलेल्या पतीने हा कृत्य केल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याने त्याचे कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.
मूल होत नसल्याने हे दोघेही शेगावला गजानन महाराज मंदिरात जायचे. २२ जून रोजीही चुलतभावाची कार घेऊन दोघे शेगावला गेले. येताना गाडी जीपला धडकली आणि त्यात गाडीतून बाहेर येताच गाडी पेटल्याचा बनाव अमोलने केला होता. मात्र तो फार काळ टिकला नाही.
कार जळताना अमोलने नेमके काय प्रयत्न केले? कार लॉक होत नव्हती, तर सविता कशा काय बाहेर पडल्या नाहीत आणि काच फोडून त्यांना बाहेर का काढले नाही? असे प्रश्न पोलिसांनी विचारले आणि एकामागोमागच्या या प्रश्नांनी अमोल गांगरला. आणि उघडाही पडला. पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या पथकाने हे हेरले आणि फौजदार बलभिम राऊत यांनी अमोलला ताब्यात घेतले आणि तेथेच अकस्मात मृत्यूचा प्रकार सूत्रबध्द खूनामध्ये बदलला.. कलमे बदलली… नजराही बदलल्या आणि आयुष्याचे धागेदोरेही..!