सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : गुरुबचनसिंहजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदापूर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 162 निरंकारी भक्तांनी उत्साहाने रक्तदान केले. रक्तदान शिबिरात महिलांनीही रक्तदान केल्याची माहिती इंदापूर शाखेचे प्रमुख शिवाजी अवचर यांनी दिली.
संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने इंदापूर शाखेच्या सत्संग भवनात, रविवारी (ता. 25) सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळ सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या संदेशाची आठवण करून देताना श्री. झांबरे म्हणाले ‘रक्त धमन्यांमध्ये वहावे, नाल्यामध्ये नको’ हाच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी भक्त लोककल्याणार्थ आपल्या सेवा प्रदान करत असल्याचे सांगितले. अशप्रकारे उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदान का करावं या विषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये बारामतीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चंदूलाल सराफ या रक्तपेढीने रक्त संकलन केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांचे सहकार्य लाभले. तर सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.