रयत क्रांतीची कर्मयोगी समोरील एक जुलैच्या ठिय्या आंदोलनातून माघार..! एफआरपी साठी पंधरवड्याची मुदत मागून कर्मयोगी रयत क्रांतीला मैदानात उतरण्याअगोदर गप्प बसविले..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : वरकुटे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने झालेल्या शेतकरी मेळाव्यात 30 जूनपर्यंत कारखान्या ने एफ आर पी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. अन्यथा एक जुलैला कर्मयोगी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनाच्या इशा-याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा कर्मयोगी कडे लागल्या. पण कर्मयोगी समोरील हे ठिय्या आंदोलन रयत क्रांतीने स्थगित केले आहे. कारण कर्मयोगी ने जुलै च्या पंधरवड्यात थकीत एफ आर पी दिली जाईल असे पत्र देत आंदोलन न करण्याची विनंती केली आणि या विनंतीला रयत क्रांतीने मान दिल्याचे सांगत गाजावाजा झालेल्या कर्मयोगी च्या आंदोलनातून रयत क्रांतीने माघार घेतली.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर येथील वरकुटे बुद्रुक मध्ये शेतकरी मेळावा घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दुधाला दर मिळावा तसेच पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी थकीत असलेली ऊसाची एफ आर पी त्वरित द्यावी या विषयावरती सदर मेळावा झाला होता.
या मेळाव्यामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ३० जून पर्यंत कारखानदारांनी एफ आर पी दिली नाही तर १ जुलै २०२३ रोजी आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता व नंतर रयत क्रांती पक्ष, संघटनेचे निवेदन थकीत एफ आर पी पुणे जिल्ह्यातील कारखानदारांनी द्यावी अन्यथा १ जुलै पासून कारखान्यावरती आंदोलन करू असा लेखी निवेदन साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलगुंडवार यांना दिला होता.
तसेच इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला सुद्धा रयत क्रांती पक्ष, संघटनेने निवेदन दिले होते. सदर निवेदनाची दखल घेऊन कारखाना प्रशासनाने लेखी उत्तर दिले आहे की, जुलै २०२३ च्या पहिल्या पंधरवड्यामध्ये थकीत एफ आर पी शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे संघटनेने जाहीर केलेले १ जुलै चे आंदोलन स्थगित करावे. त्यामुळे रयत क्रांती पक्ष संघटनेचे १ जुलै २०२३ रोजी चे कर्मयोगी कारखान्यावरील ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित झाले आहे.
१५ जुलै पूर्वी जर कारखान्यांनी उसाची एफ आर पी दिली नाही तर १५ जुलै नंतर निवेदन न देता हे आंदोलन करण्यात येईल, असे रयत क्रांतीने स्पष्ट केले आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे , रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, इंदापूर तालुका अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, दौंड तालुका अध्यक्ष सरफराज शेख यांनी सदर कारखान्याला निवेदन दिले होते.