बीड – महान्यूज लाईव्ह
तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सेलू गाव म्हणजे लमाणतांडा असलेलं गाव.. तसं गावाची फार मोठी बातमी कधी होत नाही.. त्यामुळं या गावाकडं फारसं लक्ष कोणाचं जात नाही.. मात्र गेल्या काही दिवसांत या गावाची चर्चा सगळीकडे होतेय.. विशेषतः एकाच कुटुंबातील त्यातही उसाच्या तोडणीसारखे कष्ट केलेल्या आईबापांच्या घरातील तिघी बहिणी पोलिस दलात शिपाई झाल्या, थोरली मुलगी सोनाली दोन वर्षापूर्वी पोलिस झाली आणि त्यापाठोपाठ आता दोन मुली शक्ती व लक्ष्मी या पोलिस झाल्याने मारुती जाधवांचं गावात, तालुक्यात, जिल्ह्यातच नाही, तर राज्यात कौतुक होतंय..
मारुती जाधव हे बीड जिल्ह्यातील उस तोड मजूर. काही वर्षांपासून ऊस तोडणी मुकादम म्हणून काम करतात. त्यांना पाच मुली व दोन मुले आहेत. या मोठ्या कुटुंबाला जगविण्यासाठीच नाही, तर शिकविण्यासाठीही गुरासारखे कष्ट उचलण्याची तयारी मारुती जाधवांनी दाखवली. कष्टही केले, मात्र मुलांनी शिकलेच पाहिजे यावर मात्र कटाक्ष ठेवला.
वेळप्रसंगी मारुती जाधव यांच्या पत्नीने मंगळसूत्रही गहाण ठेवल्याचे या कुटुंबाच्या स्मरणात आहे. मात्र मुलींच्या शिक्षणावर भर दिला. पोरींनीही या कष्टाचे भान ठेवले व जाणीव ठेवत शिक्षणात भरारी घेतली. सोनाली, शक्ती व लक्ष्मी या तिघीही पोलिस भरतीसाठी तब्बल चार वर्षे प्रयत्न करीत होत्या. सोनाली मागील दोन वर्षापूर्वी भरती झाली. या दोघी थोड्याफार फरकाने कमी पडत होत्या, मात्र ती कसर त्यांनी यंदा भरून काढली.
मारूती आणि त्यांच्या पत्नीने घेतलेल्या कष्टाचे आणि मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या संधीचे पहिल्या वर्षी सोनालीने सोनं केलं..तर आता मारुती जाधवांसाठी उरलेल्या दोघीजणी खऱ्या अर्थाने शक्ती आणि लक्ष्मी ठरल्या.. मग गावानेही एक भलामोठा फ्लेक्स फलक उभारला आणि तिघींचे कौतुक केले..