अलीकडच्या तरुणाईचा दिवस पहाटेच्या तीन वाजता संपतो अशी परिस्थिती सध्या आहे. रात्री उशिरापर्यंत वेबसिरीज, वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ, चॅटिंग करत रात्रीचा दिवस करणाऱ्या या तरुणाईचे आयुष्याचे दिवस कमी होण्याची शक्यता आहे. संशोधनातून हे सिद्ध झाले असून, किमान सात ते आठ तास झोपण्याची आवश्यकता असताना कमी कालावधीपर्यंत झोपणे म्हणजे तुमचा मृत्यू लवकर ओढवण्यासारखेच आहे.
त्यामुळे तुम्ही जर रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर सावधान! रात्री उशिरापर्यंत जागायचे; पहाटे पहाटे झोपायचे आणि दिवसा मात्र दुपारी बारापर्यंत उठायचे नाही, झोप घ्यायची अशा प्रकारचं काम सध्याची तरुणाई किंवा कोणीही करत असेल त्यांनी आत्ताच सावध व्हावे. कारण ही वाईट सवय तुमचं आयुष्य लवकर संपवू शकते.
फिनलँड मध्ये झालेल्या एका संशोधनाचा अहवाल क्रोनो बायोलॉजी इंटरनॅशनल या जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. जे उशिरापर्यंत जागी राहत आहेत, ते लोक मद्य आणि तंबाखूचे व्यसन अधिक प्रमाणात करतात आणि त्यामुळे व्यसनाधीन झालेल्या या लोकांना लवकर हृदयाचा विकार जडतो, तसेच त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे.
कोरोनाच्या काळामध्ये पासून भारतातही अशा प्रकारे उशिरापर्यंत जागणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. फिनलँडमध्ये 24000 जणांच्या बाबतीत आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्यानंतर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून, जे फिनलँड मध्ये झाले ते भारतात होणार नाही, अशा अवेर्भावात कोणी राहू नये; कारण भारतातही अशा प्रकारच्या वाईट सवयीचा परिणाम लोकांवर झाल्याचे दिसून येत आहे.