दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील आनेवाडी टोलनाका परिसरातील एका गावातील शेतात गतीमंद मुलीवर जबरदस्तीने अनेकदा बलात्कार केल्याची घटना ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली आणि त्यानंतर गावात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला थेट मुंबई गाठून तेथून ताब्यात घेतले तर अटक करण्यात आले असून न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कुठली दिली आहे.
शुभम बाळकृष्ण निकम (वय ३८ राहणार मालुसरेवाडी ता.जावली) असे आरोपीचे नाव असून याच्या विरोधात पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आनेवाडी टोलनाका परिसरातील एका गावातील मतिमंद मुलगी ही दररोज एकटीच शेळ्या चारण्यासाठी जात होती.
याची माहिती मालुसरेवाडीतील शुभम बाळकृष्ण निकम याला २०२२ रोजीच्या डिसेंबर महिन्यात समजली. ती शेतात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन त्याने त्या गतीमंद मुलीला शेतातील आडोशाला जबरदस्तीने नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला
ती गतीमंद असल्याने तिने घडल्या प्रकाराची काहीच माहिती घरच्यांना सांगितली नाही. घडल्या प्रकाराची काहीच माहिती मुलीने घरी सांगितली नाही, अशी खात्री करून व याचा गैरफायदा घेऊन त्याने पुन्हा वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मात्र ती मुलगी तब्बल सहा महिन्याची गरोदर आहे, हे घरातील पालकांच्या लक्षात येताच पालकांनी थेट भुईंज पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शुभम निकाम याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रत्नदीप भंडारे, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांचे पथक मालुसरेवाडीत गेले, पण पोलिस येणार असल्याची माहिती आरोपीला लागल्याने तो गावातून पळून गेला.
या पथकाने सातारा जिल्ह्यात आरोपीच्या अनेक नातेवाईकांच्या घरावर मध्यरात्रीच्या दरम्यान छापेमारी करुन आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही आरोपी सापडत नाही हे पाहून गर्जे आणि तपास पथकाने मुंबईकडे आरोपी शोधण्यासाठी आपला मोर्चा वळवला. तपास करत हे पथक मुंबईत जोगेश्वरी परिसरात पोहचले आणि पथकाने दिवसभर सापळा लावून शुभम निकमला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नदीप भंडारे हे करीत आहेत.