ज्ञानेश्वर रायते, सुरेश मिसाळ
इंदापूरच्या वेशीपासून इंदापूरच्या कमानीपर्यंत त्याचा दरारा होता.. १५० वर्षाचं झाड म्हणून येणारा- जाणारा कौतुकानं पाहत होता.. तो होता, शेकडो नव्हे हजारो पक्ष्यांच्या संसाराचा साक्षीदार..! पण आता मरणप्राय वेदना असलेल्या चित्रबलाक, वटवाघळांच्या भूतांना पाहत होता..!
कोण्या कवीनं म्हणून टाकलं.. ते चिंचेचं झाड दिसे मज चिनारवृक्षापरी..पण इंदापूरचं चिंचेंच झाड आता शून्य इतिहास आणि फक्त त्या काळरात्री तडफडून मेलेल्यांची झाली भूतांची नगरी..
झालं असं की, पालखी सोहळा इंदापूरच्या वेशीबाहेर पोचवून विश्रांतीसाठी मी होतो थांबलो.. हो, मीच तो.. मला काल रात्री इथंच फिरताना.. हो इथंच फिरताना ती भूतं सारी भेटली..रात्री कलकल करत, साऱ्यांची बैठक की हो भरली..
मोठा चित्रबलाक खर्जाच्या सुरात म्हणाला.. ऐका हो ऐका.. आपल्याला इथून हाकलणाऱ्या, आपल्या मातापित्याचं, लेकरांचं बळी घेणाऱ्यांना आपण आता सोडायचं नाही.. श्रीकृष्ण
फिरतोच आहे.. आता मर्यादा संपली, न्यायसुध्दा असीम
आहे..
राजा राम आहे, म्हणून ज्याच्या खांद्यावर आपण आपली मान टाकत होतो, तो तर कंसमामा निघाला..पण त्याच्याही बोकांडी आता आपलेच भूत आहे..! फक्त घाबरू नका.. फितूर होऊ नका.. नाहीतर तुमचीच हाडकं, तुमचेच सांगाडे फितूर होतील.. यावर्षीच्या न्यायासाठी कैक वर्षांनी निकाल फिरवतील..
तुम्ही फक्त फितूर होऊ नका.. कोणतीही उलटसुलट साक्ष देऊ नका.. असं वृध्द चित्रबलाक म्हणाला.. त्यावर सगळ्यांनी संमती देताच काळं वटवाघूळ डोळं किलकिलं करीत म्हणालं..आपण आपली चिंता करतोय.. चिंचाची पण चिंता करायला हवी.. मी काय म्हणतो..झाड खरंच पडायला झालं होतं का?
तेवढ्यात कण्हत..कण्हत खोल आतून आवाज आला.. सारी भुतं दचकली.. पण भ्यायचं कोणाला? अरे, आपणच तर भूतं आहोत, हे लक्षात येताच पुन्हा सावरली.. अरेच्या.. हे तर चिंचेचं मूळ..!
चिंचेचा तो वारसदार सांगू लागला.. तुकोबांची पालखी येईल म्हणून सारा जामानिमा सुरू होता.. झाडावरच्या घरट्यात सुध्दा बगळ्यांचा थाट काही औरच होता.. पाऊस, अन वादळाची सुरवात होईलच, असं चित्रबलाकांची आई बोलली.. तेव्हा आहे की, हे चिंचेचं झाड, सावरील आपल्याला.. असं बगळ्यांचा बाप बोलून गेला होता.. मला केवढं कौतुक वाटलं.. एवढे संसार आपल्या खांदयावर.. आपल्या विश्वासावर.. मग आम्ही सारी मूळ आणखी घट्टपणे पाय रोवून उभे राहिलो.. या पावसाळ्यात कोणतीही वादळं झेलायला..!
मलाही माझ्या ताकदीवर भरोसा होताच.. एकाच्याही केसाला धक्का लागू देणार नाही हा माझा पण होता.. पण अचानकच एक अजस्त्र धूड आलं.. गदागदा हलवायला लागलं..माझा मीच थरारलो.. माझा मीच शहारलो.. काय करावं कळेना.. काहीच प्रतिकार होईना.. मी हतबल झालो.. झालो हवालदिलही.. सांगताही येईना, बाबांनो, उडा लवकर.. घ्या भरारी.. वाचवा स्वतःला.. जणू काळाचा घालाच माझ्यावर पडला होता..!
अन अचानक.. होत्याचं नव्हतं झालं..काय सांगू बाबांनो, मी तुम्हाला वाचवू शकलो नाही, याचं आजही दुःख होतंय..ते सांगता येत नही.. म्हणून तर गाडून घेतलंय आता, आता पुन्हा उभारून यावंसं वाटत नाही.. फिरून पुन्हा जन्मायला धाडस आता होत नाही..
वटवाघूळ म्हणालं.. बाबा.. काळजी करू नका.. न्याय तर मिळेल, पण आता गेलेली पाखरं थोडीच येणार आहेत? ज्यांच्याबरोबर आयुष्य घालवायचं, तेच आता नाहीयेत.. खरंतर आपलं दुःख तसंच आहे, जसं त्या बालासोरच्या रेल्वेतल्या पिडीतांचं आहे..
तसं उसळून वृध्द चित्रबलाक म्हणाला.. खबरदार.. जर आसवं गाळाल तर?… कृष्णा फिरतोच आहे.. सारथ्य करीत.. आपलं दुःख वाटून घेत कोणीतरी गफूरमियाही फिरतोय.. माणसांनीच वरवंटा फिरवलेल्या आपल्या संसारावर कोणीतरी माणूसच न्यायाची दाद मागत फिरतोय… आपल्याला त्याच्यासाठी पुरावे गोळा करायचेत.. त्यासाठी राखेतूनही उठायची हिंमत दाखवावी लागेल..
उद्या सकाळ होईल, तेव्हा राजातला राम जागा करण्यासाठी सांगाडेही बोलू लागतील.. सांगाड्यांनो बोलाल ना? नाही, तुम्हाला बोलावंच लागेल.. त्या रात्री एका क्षणात आपले संसार उध्वस्त करण्याच्या क्षणाची.. आपल्या लेकराबाळांना जग पाहण्याअगोदरच उध्वस्त करणाऱ्या काळाची तुम्हाला शपथ आहे..तुकोबारायांनीही वर्षानुवर्षे हेच सांगितलंय.. भले तरी लेऊ कासेची लंगोटी.. नाठाळांच्या माथी हाणू काठी.. आपलं आता गमवायचं काहीच उरलं नाही.. जे गमवायचं, ते आपल्याला मारणाऱ्यांना… बोला उचला भंडार..! जय मल्हार..!!