सुरेश खोपडे, निवृत्त पोलिस महासंचालक
एमपीएससी परीक्षेत निवड झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा तिच्याच बरोबर एमपीएससीची तयारी करणार्या पण अपयशी ठरलेल्या तरुणाने खून केला. याला अनेक कंगोरे आहेत. गावोगावी शाळा निघाल्या. बेटी बचाओ बेटी पढाव या घोषणांचा जयघोष चालू झाला.
स्वतः IAS असताना वाट्याला आलेली नोकरी सोडून इतरांना IAS बनवण्यासाठी धर्माचा अधिकार मिळालेला व त्या सारख्यांनी पुण्यात अनेक संस्था उभ्या केल्या. यश का मिळत नाही? मिळालेच पाहिजे .मी नाही का मिळविले?
फक्त मनात विश्वास हवा! असे सांगणाऱ्या पाटलांच्या ऑडिओ व व्हिडिओचे श्रवण तमाम मराठी मुले रात्रंदिवस कानाला लावून करत असतात. मग मुले पेटून उठतात. सरकारी अधिकाऱ्याची स्वप्न पाहायला लागतात. तशी स्वप्न पाहणे हे मुळीच गैर नाही. प्रत्येकाने पाहावीत. पण हे विश्वास देणारे पाटील हे सांगत नाहीत की, दरवर्षी सहा ते सात लाख मुलं परीक्षेला बसतात व त्यातील अंदाजे 700 पर्यंत मुलांना नोकऱ्या मिळतात. एक मुलगा निवडला गेला तर 9999 मुलांना अपयशी म्हणून आयुष्यभर जगावे लागते!
इकडे दर्शनासारख्या मुलीच्या वडिलांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी होते. बदलत्या काळानुसार मुलींना शिकवले पाहिजे, त्या मोठ्या पदावर गेल्या पाहिजेत असे वाटते. एका मुलीचा बाप म्हणून मलाही तेच वाटत होते. तर दुसरीकडे इंदुरीकर महाराजांसारखे संस्कृती रक्षक दिवसाला तीन तीन कीर्तने सांगून अशा बापांची व मुलींची खिल्ली उडवतात. सांगत असतात की, माय बाबांनो आपल्या पोरीवर लक्ष ठेवा. नाहीतर ती खानदानाची अब्रू घालवेल.
दर्शना पवार सारख्या मेहनतीने अभ्यास करतात. यश मिळवतात. पण खेडेगावातील लोक तसेच इंदुरीकर सारख्यांच्या तत्त्वज्ञानामुळे मुलीवर कायम दबाव ठेवला जातो. मुलींना शहरात पाठवावे की पाठवू नये या द्विधा मनस्थितीत पालक असतात. अशा मुली शहरात आल्या की बंधनातून मुक्त होतात. स्री सुलभ भावनातून मैत्री जमते. त्यातून हंडोरे सारखे अशाच महत्त्वकांक्षेणे पछाडलेले तरुण भेटतात. आणि मग त्यातून कुणाचीच सुटका होत नाही.
अधिकारी बनण्यासाठी सुरू केलेल्या व आपल्या धर्मावर पूर्ण अधिकार असलेले अकॅडमी चे मालक व यशाचा विश्वास सांगणारे वक्ते यांचे यात काहीच नुकसान होत नाही. यातील खून करणारा हंडोरे व दर्शनाचे पालक यांनी काय करावे?
जन्मलेल्या प्रत्येक बालकांमध्ये कोणत्या ना कोणत्या एका गोष्टीसाठी विशिष्ट अशी बुद्धिमत्ता (genius) असते. ती फक्त सरकारी अधिकारी बनण्यासाठीच नसते. पण त्याची जाण त्या मुलाला, त्याच्या पालकांना, शिक्षकांना नसते. सर्वसाधारणपणे डॉक्टर वकील इंजिनियर, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा,व इतर थोडीशी करिअर बद्दल माहीत असते.
मुळात मुलांना मोठी स्वप्न पाहायची असतात. पण कोणती स्वप्न पहावीत हे त्यांना माहीतच नसते. हा दोष इथल्या शिक्षण पद्धती मध्ये आहे . सध्याची शिक्षण पद्धती असं काही शिकवत नाही. ती मार्काची टक्केवारी किंवा ग्रेड याकडे जास्त लक्ष देते.
ते ओळखून त्यावर उपाय म्हणून ‘कुडाची शाळा’ हा उपक्रम 2013 पासून मी मोरगाव येथे उभा केलेला आहे. या शाळेत दोन दिवसांचे निवासी शिबिर सुरू केलेले आहे. सरकारी अधिकारी बनण्याचे ध्येय अवश्य ठेवा पण त्याचबरोबर ते नाही तर दुसरे काय? यासाठी बी प्लान तयार ठेवा. एमपीएससी शिवाय 600 वेगवेगळ्या डिग्री व डिप्लोमा मधून आपल्या आवडीचे करिअर करता येते याबद्दलचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. आणि हे मार्गदर्शन वयाच्या अकराव्या वर्षापासून घेता येऊ शकते.
एकट्या पुणे शहरात एक लाखापेक्षा जास्त दर्शना व हंडोरे आपले नशीब आजमावण्यासाठी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. त्यांना हा पर्याय समजून सांगणे हे माझ्यासारख्याला महत्त्वाचे वाटते म्हणून हा लेख.