दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील भागवतवाडी परिसरात अज्ञात चोरांनी बंद घराचा दरवाजा तोडून घरातील तब्बल ७ लाख ८२ हजार किमतींचे मौल्यवान सोने व चांदीचे ऐवज चोरी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस परिसरात असलेल्या भागवतवाडी येथील सुवास्तु कॉम्प्लेक्समधील महेशकुमार विजयकुमार बोरसे यांच्या बंद असलेल्या घरी गुरुवारी (दि.२२) सकाळी ९.१५ ते सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कशाच्यातरी सहाय्याने वाकवुन कुलूप तोडले.
यानंतर अज्ञात चोरट्याने घरातील बेडरूममधील कपाटामधील विविध प्रकारच्या सोने व चांदीचे दागिने ठेवलेली पिशवी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी महेशकुमार बोरसे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत.