बारामती : महान्यूज लाईव्ह
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील बोराटे सरांचा व्हिडिओ सध्या संपूर्ण राज्यभर गाजतोय. या शिक्षकाची बदली झाली आणि शाळेतल्या मुलांपासून ते अख्ख्या गावातल्या आबालवृद्धांपर्यंत सारेच धाय मोकलून रडले. या गुरुजीला निरोप देताना सारा गाव हळहळला. गुरुजी आपल्या शाळेतून जाऊच नयेत असे मुलांना वाटत होते, कारण गेल्या दहा वर्षात त्यांनी सारी शाळा बदलून टाकली होती, पण त्याच्या उलट साऱ्या सुविधा असलेल्या बारामतीत घडतंय.
बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावच्या एका सजग नागरिकाने अचानक शाळाभेट केल्यानंतर हा प्रकार समोर आला. ही घटना बारामती तालुक्यातील तरडोली येथील भोईटे वस्ती येथील शाळेतील आहे.
याबाबतचा व्हिडिओ बनविला गेल्याने तो इतरांच्या नजरेस पडला आहे अन्यथा या शाळेत नेमकं काय चालतं हे कोणालाच समजलं नसतं. याप्रकरणी बारामती तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमल्याचे सांगितले जात असून या शिक्षकावर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत 25 विद्यार्थी शिकतात. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र या शिक्षकांमध्ये काहीच बदल झाला नाही त्यामुळे ग्रामस्थ नाराज होते अशातच एका ग्रामस्थाने चक्क दुपारच्या वेळी शाळेत जाऊनच सारा प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओच केला आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांनी दररोज पाहत असलेला बेधुंद गुरुजी संपूर्ण राज्याने पाहिला.
हा शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेला होता. भरपूर दारू प्यायल्याने हा गुरूजी शुद्धीत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सगळीकडे वायरल झाला. याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली असून त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी होईल जे तपासणीत येईल त्यावर कडक कारवाई होईल असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकाला देखील नोटीस बजावली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.