दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथील गंगासागर पार्क अचानक राज्याच्या चर्चेत आला. कारण येथील 201 नंबरच्या रूममध्ये राहणारे डॉक्टर अतुल दिवेकर, त्यांची पत्नी पल्लवी, मुलगा अद्वित आणि मुलगी वेदांतिका यांच्या मृत्यूच्या घटनेने साऱ्या राज्यात खळबळ उडाली होती. त्यांना काल रात्री साडेनऊ वाजता वरवंड येथील स्मशानभूमीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
अजूनही डॉक्टर अतुल दिवेकरांनी आपलं कुटुंब का संपवलं? या धक्क्यातून लोक सावरलेले नाहीत. सकाळी पत्नीला गळा आवळून ठार केले. दोन मुलांना वरवंडच्या गणेशवाडीतील उसाच्या शेतात असलेल्या विहिरीत ढकलून त्यांचा देखील त्यांनी खून केला आणि त्यानंतर हे आयुष्य आपले आता उरलेच नाही, असे समजत घरी येऊन स्वतःचाही शेवट करून घेतला.
डॉक्टर अतुल दिवेकरांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने खरंतर इतर अनेक संशयाचे पर्याय निकामी ठरले, मात्र कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे डॉक्टर दिवेकर यांनी म्हटल्याने उच्चशिक्षित कुटुंबांना आणि ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबांनाही मोठा धक्का बसला आहे.
कारण उच्चशिक्षित होऊन माणूस शहाणा होतो का? या प्रश्नानं आता अनेकांना अस्वस्थ केले आहे, कारण कौटुंबिक वादात आपला शेवट करताना निर्दोष असलेल्या मुलांचाही का शेवट करावा? या प्रश्नांनं अनेकांना अजूनही घेरलेलं आहे. जवळपास आठ ते दहा तास या मुलांचा शोध सुरू होता आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर कोणी किती रडावं? कशासाठी रडावं? हेच कोणाला कळत नव्हतं. या मुलांचा दोष काय म्हणून नागरिकही हेलावले होते. या सर्वांना एकाच वेळी वरवंडच्या स्मशानभूमीत भडाग्नी देण्यात आला. या स्मशानभूमीत तसेही एरवी एकाच वेळी चार जणांना अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली नसावी. पण या घटनेने ती आली.