दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
कमी दरात सोने देतो असे सांगून साथीदारांसह पोलीस असल्याची बतावणी करुन २५ लाखांची फसवणुक केली. यामधील ४ संशयित आरोपींना भुईंज पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेल्या कार व १२ लाख ५० हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेतले.
२० जून २०२३ रोजी दुपारी १२.३० ते १३.३० वाजण्याच्या सुमारास सांगलीतील कोल्हापूर रोडवरील विष्णुआण्णा फळमार्केट येथे फिर्यादी मयुर सुभाष जैन (वय ३९ वर्षे, व्यवसाय व्यापार रा. ३०१, सुमंगल अपार्टमेंट, मोतीबाग, शिवाजीनगर पुणे) व त्याचे मित्र हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रशांत भुजंगराव निंबाळकर (वय- ४८ वर्षे, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) यांच्यासोबत स्वस्तात सोन्याचा व्यवहार पूर्ण करणेसाठी आले होते.
निंबाळकर व त्याच्या साथीदारांनी आपसात संगनमत करुन मयूर जैन याला सोन्यासारखे
दिसणारे, हातात मावेल एवढे धातुचे बिस्कीट दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि निंबाळकर याने त्याचे इतर दोन साथीदार पोलीस असल्याची बतावणी केली. मग जैन याच्याकडून २५ लाख रुपये साथीदारामार्फत घेतले, मात्र सोने न देता त्यांची फसवणुक करुन २५ लाख रुपये रक्कम घेऊन ते पसार झाले.
याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील फसवणूक झालेली रक्कम ही मोठी असल्याने तसेच आरोपी फसवणुकीची रक्कम घेऊन गुन्हयात वापरलेल्या गाडीसह पुण्याच्या दिशेने जात असलेबाबत माहिती सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना प्राप्त झाली.
त्याप्रमाणे त्यांनी ही माहिती भुईंजचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे यांना दिली व आणेवाडी टोलनाका येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी तात्काळ भुईंजचे पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, नितीन जाधव, सुशांत धुमाळ, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलावडे, महिला पोलीस अंमलदार रुपाली शिंदे, प्रियंका देशमुख तसेच महामार्ग पोलीस पथकातील पोलीस अंमलदार नवनाथ पवळे व जटाप्पा लोणार यांचेसह आणेवाडी टोलनाका येथे नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान संध्याकाळी सात वाजता गुन्हयातील संशयित कंपास मॉडेलचे जीप कंपनीचे वाहन हे सातारा बाजूकडुन पुणे बाजुकडे येताना दिसले. पोलीस पथकाने सदरचे वाहन अत्यंत कौशल्याने आणेवाडी टोलनाका येथे ताब्यात घेतले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुन्हयातील मुख्य आरोपीसह इतर १ संशयित पुरुष व २ महिला मिळुन आल्या.
संशयितांची व त्यांच्या ताब्यातील वाहनाची
तपासणी केली असता गुन्हयातील मुख्य आरोपी प्रशांत भुजंगराव निंबाळकर (वय- ४८ वर्षे, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) याचे ताब्यात फिर्यादीची फसवणुक करुन आणलेल्या रकमेपैकी १२ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम मिळुन आली.
संशयितांच्या ताब्यात मिळून आलेले गुन्हयातील वाहन जीप कंपास कार (क्रमांक एम एच
१२ पी. झेड. ७९९२) तसेच गुन्हयातील जप्त मुद्दमाल रोख रक्कम १२ लाख ५० हजार रुपये असा एकुण २७ लाख ५० हजार रुपयांचा मुददेमाल दोन पंचांसमक्ष जप्त करुन जप्त मुद्दमालासह संशयीत आरोपी यांना पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
गुन्हयातील आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन संशयीत आरोपी प्रशांत
भुजंगराव निंबाळकर, वय – ४८ वर्षे, रा. नांदुरा, जि. बुलढाणा याचेवर २ गुन्हे असून, प्रविण महादेव खिराडे( वय- ३७ वर्ष रा.तायडे कॉलनी खामगाव) याच्यावर २ गुन्हे, मानसी सुरेश शिंदे (वय ३० वर्ष रा.सारोळा ता.मुळशी जि.पुणे, सध्या रा.शिवसाई नगर वाघजाई मंदिरा जवळ कोथरुड पुणे) हिच्यावर तर फसवणूकीचे ४ गुन्हे दाखल आहेत .
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक बापु बांगर, वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंजचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे, पोलिस अंमलदार चंद्रकांत जाधव, नितीन जाधव, सुशांत धुमाळ, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलवडे, सागर मोहिते, महिला पोलिस अंमलदार रुपाली शिंदे, प्रियांका देशमुख, महामार्गाचे पोलिस अंमलदार नवनाथ पवळे, जटाप्पा लोणार यांनी ही धाडसी कामगारी
केल्याने त्यांचे जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.