राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौड : दौंड तालुक्यातील वरवंड येथील पशुधन पर्यवेक्षक असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून करून दोन लहान मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती. अख्ख कुटुंबच त्यांनी संपवलं होते..!
मन सुन्न करणाऱ्या या घटनेने वरवंडच नाही तर दौंड तालुका हतबुद्ध झाला. त्या लहान जीवांचा काय दोष?, त्या चिमुकल्यांनी अजून जगही नीट बघितले नव्हते, बाप इतका निर्दयी का बनला? असा काय वाद होता की, घरातील वादामुळे त्या चिमुकल्याच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला?
उच्चशिक्षित असलेल्या या डॉक्टरानी असं का केलं असेल? याचीच चर्चा या घटनेनंतर सर्वत्र सुरू होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लहान मुलांना विहिरीत टाकले हे नमूद केल्याने पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी क्षणाचा विलंब न करता घरापासून अंदाजे एक किलोमीटर अंतर असलेल्या उसाच्या शेतातील विहीर गाठली.
विहिर पाण्याने तुडुंब भरली असल्याने पोलीस आणि ग्रामस्थ सुरुवातीला गोंधळून गेले. विहीर अत्यंत खोल आणि अरुंद असल्याने या चिमुकल्यांचा शोध घेणे अवघड होते. ग्रामस्थांनी विहिरीतील पाणी बाहेर काढण्यासाठी दोन – दोन वीजपंप लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ पुणे येथील विशेष पथकाला पाचारण केले.
अंधार पडल्याने लाईटचा उजेड करून मुलांची शोध मोहीम सुरू होती. रात्री सुरुवातीला मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यांनतर तासाभरात मुलाचा ही मृतदेह सापडला. चिमुकल्यांचे हे मृतदेह पाहून अनेकांचे डोळे पाणावले. मन सुन्न करणाऱ्या घटनेने पोलिसांच्या डोळ्यातही अश्रू आले.
यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण आदींसह पाटस व यवत पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी रात्री उशिरा त्यांचे मृतदेह शवच्छेदनासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.
वरवंड येथील चैताली अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या पशुधन पर्यवेक्षक असलेल्या डॉ. अतुल शिवाजी दिवेकर ( वय ४२), शिक्षिका असलेल्या पत्नी पल्लवीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलगा अदिवत व वेदांती यांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली. घरी जाऊन गळफास घेऊन त्याने स्वतःला ही संपवले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यवत पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमागे नेमके काय कारण आहे ? हे शोधून काढतीलच, मात्र अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर पुणे जिल्हा हादरून गेला.