इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा अमेरिकेला जाण्या अगोदर चांगलाच गाजत आहे, त्यातच एक बातमी महत्त्वाची आणि चांगल्या प्रकारची आहे की, मोदींच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदीं समोर अमेरिकेचे राष्ट्रगीत चक्क मराठमोळी रिया पवार गाणार आहे. ही सोळा वर्षीय रिया पवार ही मूळ वालचंदनगरच्या रहिवासी असलेल्या भारतीय अमेरिकन पवार कुटुंबातील आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. उद्या 21 जून रोजी मोदी अमेरिकेत पोहोचत आहेत. त्यांचा 23 जून पर्यंत हा अमेरिका दौरा असणार असून वॉशिंग्टन मधील रोनाल्ड रेगन बिल्डिंगमध्ये अनिवासी भारतीय असलेल्या इंडियन डायस्पोरा यांच्या आयोजित कार्यक्रमात रिया हे राष्ट्रगीत जाणार आहे. त्यासाठी तिची निवड करण्यात आली आहे.
मूळचे वालचंदनगरचे रहिवासी असलेले आणि त्यानंतर पुण्यात गेलेले रियाचे आई-वडील श्रद्धा व राहुल पवार आणि भाऊ रिशान हे गेल्या अनेक वर्षांपासून न्यू जर्सीमध्ये राहतात. श्रद्धा व राहुल यांची मुलगी असलेली रिया हिला पाच वर्षापासूनच गायनाची आवड होती त्यामुळे ती हेमंत कुलकर्णी यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत होती. याचबरोबर ती बॉलीवूड आणि पाश्चिमात्य संगीतही शिकते. गायनाव्यतिरिक्त, रिया शाळेतही हुशार असून सन 2021 मधील मिस इंडिया टीन न्यू जर्सी 2021 चा किताब तिने जिंकला.
रिया म्हणाली की ” मला ही संधी मिळते आहे त्याचा आनंद तर आहेच, शिवाय माझ्या अमेरिकन आणि भारतीय अस्तित्वाच्या दोन्ही बाजू या निमिताने एकत्र आलेल्या पाहून मला खूप आनंद झाला आहे. “