धाराशिव – महान्यूज लाईव्ह
मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडले होते, आम्ही ते पुन्हा देत आहोत असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीवर निशाणा साधला, निमित्त होते, धाराशिव येथील प्रकल्पाच्या शुभारंभाचे.. मात्र यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही फडणवीस यांना फटकारले.
यावेळी यंत्रपूजा करताना फडणवीस यांनी बारामतीला लक्ष्य करीत पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे पाण्यावर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र ज्यांना हे प्रेम कळते त्यांना ही पुजा का महत्त्वाची आहे ते कळेल, असे म्हणून पवार कुटुंबियांना लक्ष्य केले.
यावेळी फडणवीस म्हणाले, कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला ६५ टीएमसी पाणी अपेक्षित होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ६५ टीएमसी पाण्याची घोषणा झाली, प्रत्यक्षात आता फक्त ७ टिएमसी पाणी देण्याचेच काम सुरू आहे. दरम्यान माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागणीवरून निरा देवघरसाठी १०० कोटींची तरतूद केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस धाराशिवमध्ये बोलल्यानंतर पत्रकारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना छेडले, तेव्हा फक्त बारामती हे नाव घेतले की, ब्रेकींग सुरू होते, म्हणून हे सुरू आहे असे म्हणत फडणवीस यांना फटकारले. बारामतीत कोणतेही पाणी अडवले किंवा अडकलेले नाही. फडणवीसांनी वस्तुस्थिती सांगावी, पाणी कुठेही अडलेले नाही, बोगद्याचे काम उलट सुरूच आहे असे पवार यांनी सांगत फडणवीसांचे आरोप फेटाळले.