भुईंज येथील ‘केबीपी’च्या संचितचीही नंबरी कर्तबगारी
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
त्याचं मूळगाव धाराशिवकडचं. आई वडील पोटापाण्यासाठी १५-१६ वर्षांपूर्वी भुईंजमध्ये आले.. चौथीपर्यंत झेडपीच्या वारागडेवाडीतील शाळेत शिक्षण.. मग पाचवी पासून १२ वी पर्यंत भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षण. याच दरम्यान २०१७ साली वडिलांचे निधन झाले. घरात आई,धाकटी बहीण आणि तो..!
सुट्टीत काम करून घराला हातभार लावण्याशिवाय पर्याय नाही.. त्यामुळे खासगी क्लासचा विचारही करणे अशक्य. वर्गात शिकवले जाईल, ते ध्यानात ठेवायचं, घरी येऊन कामातून वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा. अशा परिस्थितीत येणाऱ्या समस्यांवर मात करत संचित दत्तात्रय कसबे याने CET मध्ये 82 टक्के पर्सेंटाइल मिळवले.
भट पेट्रोलपंपावर काम करत असणाऱ्या या पोराची ही कर्तबगारी अनेकांसाठी आदर्शवत ठरावी अशीच. कोणत्याही सुविधा नाहीत, की कसले लाड नाहीत. अभ्यासाला पुरेशी साधने नाहीत, की हौसेमौजेच्या कुठल्या वस्तू नाहीत. ना छानछोकीचे जीवन.. ना स्वतःचं हक्काचं छप्पर. कोणत्याही गोष्टींसाठी जुराईची आणि हट्ट करायची त्याची आता क्षमताही नाही आणि औकातही.. म्हणूनच त्याचा लढा त्याने स्वतःच लढायचा ठरवला आणि त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला.
काहींना कदाचित संचितचे गुण विशेष वाटणार नाहीत, मात्र त्याला ज्या शाखेत पुढची वाटचाल करायची आहे, त्यासाठी ते पुरेसे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने ते जगण्यासाठी लढाई लढताना केलेल्या ढोरमेहनतीसोबत केवळ कॉलेज मधील शिक्षकांचे मार्गदर्शन व सेल्फ स्टडीवर प्राप्त केले आहेत. त्यासाठी त्याचे व इतर अशा सर्व विद्यार्थ्याचे आणि त्यांच्या शिक्षकांचे कौतुक करावेच लागेल.